राजा बिम्बिसाराचा गुप्त खजिना आजही अस्तित्वात असलेली ‘सोन भंडार’ गुफा


मौर्य राजवंशाचा शासक राजा बिम्बिसाराची कारकीर्द इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. बिम्बिसार मगध साम्राज्याचा सम्राट असून, एक उत्तम, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष राज्यकर्ता म्हणून त्याचा लौकिक होता. त्याच्या अधिपत्याखाली प्रजा अतिशय सुखी होती. बिम्बिसार एका संपन्न साम्राज्याचा सम्राट असल्याने त्याच्याकडे संपत्तीची काही कमतरता नव्हती हे तर खरेच, पण विशेष गोष्ट अशी, की बिम्बिसाराची संपत्ती आजही अस्तित्वात असून, एका गुहेमध्ये लपविली असल्याची मान्यता प्रसिद्ध आहे. मात्र या गुहेमध्ये प्रवेश मिळविल्यानंतरही ही संपत्ती बिम्बिसाराने कुठे दडविली असावी, हे गूढ आजतागायत कोणालाही उकललेले नाही. प्रसिद्ध आख्यायिकांच्या अनुसार बिम्बिसाराने आपला खजिना ज्या गुहेमध्ये लपविला ती गुफा बिहार राज्यातील राजगीर या ठिकाणी आहे. राजगीर प्राचीन काळापासून मगध साम्राज्यातील महत्वाचे शहर असून, हे ठिकाण मगध साम्राज्याची राजधानी म्हणूनही ओळखले जात असे. त्याशिवाय भगवान बुद्धांनी याच ठिकाणी बिम्बिसाराला धर्मोपदेशन केल्याने या ठिकाणी भगवान बुद्धांना समर्पित अनेक स्मारके आहेत.

याच राजगीर गावामध्ये ‘सोनभंडार’ नामक एक गुफा आजही अस्तित्वात असून, याच गुहेमध्ये बिम्बिसाराने आपला अमूल्य खजिना लपविला असल्याचे म्हटले जाते. या गुहेमध्ये आजवर अनेक हौशी संशोधक, इतिहासकार, पुरातत्त्ववेत्ते यांनी या खजिन्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला खरा, पण यश कोणालाच लाभले नाही. बिम्बिसाराचा खजिना या गुहेमध्ये असला, तरी तो नेमका कुठे लपविला आहे हे आजवर कोणीच सांगू शकलेले नाही. काही आख्यायिकांच्या अनुसार हा खजिना बिम्बिसाराचा नसून, जरासंघ नामक मध सम्राटाचा असल्याचेही म्हटले जाते. मात्र हा खजिना बिम्बिसाराचा असावा असे निश्चितपणे सांगणारे अनेक पुरावे सोनभंडार पासून काही अंतरावर असलेल्या एका कारागृहामध्ये असल्याचे म्हटले जाते. याच कारागृहामध्ये बिम्बिसाराला त्याचा मुलगा अजातशत्रू याने बंदिवासात ठेवले होते. त्यावेळी खजिना सोनभंडार गुहेत असल्याचे अनेक पुरावे बिम्बिसाराने येथे ठेवले असल्याचे म्हटले जाते.

सोनभंडार गुहेमध्ये प्रवेश केल्यावर सुरुवातीला १०.४ मीटर लांबीची, ५.२ मीटर रुंद आणि १.५ मीटर उंचीची एक खोली दिसते. खजिन्याचे रक्षण करण्यासाठी नेमलेल्या पहारेकऱ्यांकरिता ही खोली बनविली गेली असल्याचे म्हटले जाते. या खोलीच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीमधून खजिन्यापर्यंत पोहोचण्याची वाट बनविली गेली असल्याचे म्हटले जाते. ही वाट दगडी दरवाजाने बंद करून टाकली गेली असून, हा दरवाजा उघडणे आजवर कोणालाच शक्य झाले नसल्याचे म्हटले जाते.

या गुहेच्या भिंतींवर शंख लिपीमध्ये काही शिलालेख आहेत. या शिलालेखांचा अर्थ लावणेही आजवर इतिहासकारांना किंवा पुरातत्ववेत्त्यांना शक्य झालेले नाही. या शिलालेखामध्ये या खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगितला गेला असावा, असे ही अनेकांचे म्हणणे आहे, त्यामुळे हा शिलालेख वाचून याचा अर्थ लावण्याचा आणि पर्यायाने खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातून अनेक हौशी मंडळी, इतिहासकार आणि पुरातत्ववेत्ते येथे येत असतात. काही मान्यतांच्या अनुसार, बिम्बिसाराच्या खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वैभावगिरी पर्वत सागरापासून सप्तपर्णी गुफांपर्यंत जातो आणि हाच मार्ग सोनभंडार गुहेच्या दुसऱ्या टोकाला उघडतो, पण या मान्यतेच्या सत्यासत्यतेची पडताळणी आजवर कोणी करून पाहिल्याचे ऐकिवात नाही. असे ही म्हटले जाते, की इंग्रजांनी खजिना हस्तगत करण्याच्या उद्देशाने या गुहेवर तोफा डागून या गुहेमध्ये असलेला दगडी दरवाजा पाडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तोफांच्या माऱ्यानेही हा दरवाजा उघडण्यात अपयशच आले. त्या काळी डागलेल्या तोफांच्या माऱ्याच्या खुणा आजही या दरवाजावर दिसून येतात.

Leave a Comment