असा आहे केदारनाथ धामचा इतिहास


यंदाच्या वर्षी दहा मे रोजी केदारनाथ मंदिराची द्वारे भाविकांसाठी खुली करण्यात आली, आणि केदारनाथाच्या यात्रेला सुरुवात झाली. दरवर्षी सहा महिन्यांच्या तीव्र हिवाळ्याच्या अवधीनंतर ही द्वारे भक्तांकरिता खुली केली जात असतात. केदारनाथ धामाची द्वारे खुली करण्यात आल्यानंतर देश-विदेशातून हजारो भाविक ‘बाबा केदारनाथा’च्या दर्शनाला येत असतात. ही यात्रा शीत ऋतूचे आगमन होईपर्यंत सहा महिने सुरु राहते. एकदा शीत ऋतूला प्रारंभ झाला, की केदारनाथ आणि त्याचबरोबर बद्रीनाथ धामांची द्वारे पुन्हा बंद केली जाऊन यात्रा समाप्त होते. या मंदिरांची द्वारे बंद केल्यानंतर येथे कोणीही प्रवेश करीत नाही. अशा वेळी मंदिरातील देवतांची नित्याची पूजा-अर्चा देवतांच्या द्वारेच केली जात असल्याची मान्यता येथे रूढ आहे.

केदारनाथ धामाची द्वारे जेव्हा सहा महिन्यांकरिता बंद केली जातात, तेव्हा द्वारे बंद होण्यापूर्वी एक अखंडज्योती मंदिरामध्ये तेवती ठेवण्यात येते. मंदिराची द्वारे सहा महिन्यांनंतर पुन्हा खुली करण्यात आल्यानंतरही ही ज्योती तेवत असल्याचे दिसून येते. ही ज्योती अखंड तेवत ठेवण्याची कामगिरी देवता स्वतः बजावीत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. केदारनाथ मंदिराची स्थापना आदी शंकराचार्यांनी केली असल्याचे म्हटले जाते. त्याशिवाय पांडवांशी निगडित केदारनाथ धामाच्या कथाही ऐकिवात आहेत. केदारनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, या शिवलिंगाचा आकार त्रिकोणी आहे. या लिंगाच्या स्थापनेविषयी आख्यायिका अशी, की या मंदिराच्या मागे उभ्या असणाऱ्या केदार पर्वतावर नर आणि नारायण ऋषी तपस्या करीत होते. हे महातपस्वी भगवान विष्णूचे अवतार समजले जात. त्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले, आणि लिंगरूपाने तिथे कायमस्वरूपी वास करण्याचे वचन त्यांनी दिले. तेव्हापासून केदारनाथाचे हे लिंग अस्तित्वात आले असल्याचे म्हटले जाते.

या धामाचा संबंध महाभारताशी देखील जोडला गेला आहे. असे म्हणतात, की युद्धामध्ये विजयी झाल्यानंतर आपल्या आप्तेष्टांचे, बांधवांचे वध केल्याच्या पापातून मुक्ती मिळावी यासाठी शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पांडव इच्छुक होते. मात्र शंकर पांडवांवर रुष्ट असल्याने त्यांना दर्शन देण्याची शंकरांची इच्छा नव्हती. शंकराच्या दर्शनार्थ पांडव काशीला पोहोचले, पण शंकर तिथे नव्हते. शंकरांच्या शोधार्थ पांडव हिमालयापर्यंत आले, आणि शंकरांचा माग काढत केदार पर्वतापर्यंत येऊन पोहोचले. तेव्हा शंकरांनी वृषभाचे, म्हणजे बैलाचे रूप धारण केले आणि इतर प्राण्यांच्या कळपामध्ये मिसळून गेले. तेव्हा भीमाने विशालरूप धारण केले आणि आपले पाय पसरून तो उभा राहिला. इतर प्राणी त्याच्या पायाखालून निघून गेले, पण बैलाचे रूप घेतलेले शंकर भीमाच्या पायाच्या खालून जाण्यास तयार होईनात. तेव्हा भीमाने या बैलाशी झटापट केली असता, बैल जमिनीमध्ये अंतर्धान पावू लागला. तो जमिनीमध्ये गडप होण्याआधी भीमाने त्याची पाठ धरली. भीमाचा निश्चय पाहून शंकर पांडवांवर प्रसन्न झाले, आणि बैलाच्या पाठीवर असलेल्या कुबडाच्या आकृतीसारखे लिंग केदारनाथ येथे अस्तित्वात आले.

याच कथेशी निगडित आणखी एक मान्यता अशी, की भीमाशी झटापट होत असताना शंकरांच्या बैलपरूपी अवताराच्या पाठीचा भाग केदार येथे, तर पाठीच्या पुढल्या धडाचा भाग नेपाळ येथील काठमांडू परिसरामध्ये अवतरला. हेच ठिकाण पशुपतीनाथ म्हणून ओळखले जाते. शंकरांचे बाहू तुंगनाथ येथे, मुख रुद्रनाथ येथे, तर नाभी मदमदेश्वर आणि जटा कल्पेश्वर येथे प्रकट झाल्याची आख्यायिका रूढ आहे.

Leave a Comment