या विवाहसोहळ्यात वधू नाहीच, केवळ वर उपस्थित


आपल्या अपत्याच्या प्रत्येक इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वच माता-पिता प्रयत्नशील असतात. गुजरातचे निवासी असलेल्या एका पित्याने देखील आपल्या सत्तावीस वर्षीय मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या विवाहाला संमती दिली. हा विवाहसोहळा पार पडला खरा, पण याची खासियत अशी, की या विवाहसोहळ्यामध्ये केवळ वर सहभागी झाला असून, या मध्ये वधू नव्हतीच. गुजरात मधील चंपलानार या लहानशा गावामध्ये वधू नसतानाही हा विवाहसोहळा दहा मे रोजी मोठ्या धूमधडाक्यात पार पडला.

गुजरातमधील साबरकंठा पासून सुमारे बावीस किलोमीटर अंतरावर चंपलानार हे लहानसे गाव आहे. या गावामध्ये राहणाऱ्या बारोट परिवारातील सत्तावीस वर्षी अजयच्या विवाहाचा हा सोहळा होता. या विवाहसोहळ्यासाठी दोनशेहूनही अधिक पाहुणे मंडळी उपस्थित होती. सुंदर सजावट, चविष्ट भोजन, संगीत, सर्व थाट होता. मात्र या सोहळ्यात कुठली कमतरता असेल, तर ती वधूची. तरीही हा सोहळा सर्व पाहुणे मंडळींच्या आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदाने पार पडला. विवाहविधी सुरु होण्यापूर्वी पारंपारिक गरबा नृत्याचे आयोजनही करण्यात आले होते. त्यानंतर विवाहविधींसाठी अजय नवरदेवाचा पोशाख परिधान करून मांडवात आला, आणि मोठ्या थाटात सर्व सोहळा पार पडला.

अजय मानसिक दृष्ट्या कमकुवत आहे. त्याच्या शारीरक वाढीच्या मानाने त्याच्या मेंदूची वाढ अपुरीच राहिली. लहानपणापासून एकत्रित परिवारामध्ये वाढलेल्या अजयला परिवारामध्ये पार पडणाऱ्या विवाहसोहळ्यांचे खूपच आकर्षण वाटे. आपले लग्न व्हावे अशी एकमेव इच्छा असणाऱ्या अजयची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय त्याच्या परिवारजनांनी घेतला. अजयची मानसिक अवस्था पाहता त्याच्यासाठी वधू मिळणे अशक्य आहे हे त्याच्या परिवारजनांनी जाणले आणि केवळ अजयची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने वधू लग्नाला हजर नसतानाही हा विवाहसोहळा विधिवत पार पडला.

Leave a Comment