ऑस्ट्रेलियातील या रुग्णालयामध्ये होतात वटवाघुळांंवर औषधोपचार


जगामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या विकारांसाठी रुग्णालये अस्तित्वात आहेत. ज्याप्रमाणे मनुष्यांवर उपचार करणारी रुग्णालये अस्तित्वात आहेत, त्याचप्रमाणे प्राण्यांवर उपचार करणारी रुग्णालयेही अस्तित्वात आहेत. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये एक रुग्णालय असे आहे, जिथे केवळ वटवाघुळांवर उपचार केले जातात. वटवाघुळे आणि त्यांच्या पिल्लांवर या रुग्णालयामध्ये उपचार केले जातात. ऑस्ट्रेलियातील एथर्टन शहरामध्ये हे रुगणालय असून, ‘टोगा बॅट हॉस्पिटल’ या नावाने हे रुग्णालय प्रसिद्ध आहे.

पॅरालिसीस पासून अपुरी वाढ झालेल्या, इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या अनेक वटवाघुळांवर या रुग्णालयामध्ये उपचार केले जात असतात. या रुग्णालयामध्ये अशी अनेक लहान पिल्ले आहेत, जी अद्याप उडण्यास अक्षम आहेत. त्या पिल्लांना या रुग्णालयामध्ये ठेऊन घेण्यात येत असून, त्याची पुरेशी वाढ झाल्यानंतर या पिल्लांना पुनश्च जंगलांमध्ये किंवा पार्क्समध्ये सोडून देण्यात येत असते.

या रुग्णालयामध्ये भर्ती असलेल्या वटवाघुळांची अगदी नवजात अर्भकांच्या प्रमाणे काळजी घेण्यात येत असून, यांना झोपण्यासाठी मऊ ब्लँकेट्सही उपलब्ध करविली जातात. तान्ह्या वटवाघुळांना बाटल्यांनी दुध पाजले जाते. हे रुग्णालय गेली अनेक दशके अस्तित्वात असून, केवळ वटवाघुळे ज्या ठिकाणी उपचारांसाठी आणली जातात, असे हे जगातील एकमेव रुग्णालय आहे.

Leave a Comment