जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल पोलंडमध्ये


जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल पोलंडमध्ये येत असून, याला ‘डीपशॉट डायव्हिंग पूल’ म्हटले जात आहे. या स्विमिंग पूलचा सर्वाधिक खोली असलेला भाग ४५ मीटर खोलीचा असून, त्यामध्ये आठ हजार क्युबिक मीटर पाणी भरले जाणार आहे. एकूण सत्तावीस ऑलिम्पिक-साईझ पूल्सच्या आकाराचा हा डीपशॉट डायव्हिंग पूल असणार आहे. सध्या जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल असल्याचा विक्रम इटलीतील ‘मॉन्टेग्रोटो टर्मे’ येथील ‘वाय-४० डीप जॉय’ या स्विमिंग पूलच्या नावे असून, हा पूल ४२ मीटर खोल आहे.

पोलंड येथील ‘डीपशॉट डायव्हिंग पूल’चे निर्माणकार्य सध्या सुरु असून, हा पूल पोलंडची राजधानी वॉरसॉ पासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मेसझोनोव्हा नामक शहरामध्ये बनत आहे. हा स्विमिंग पूल जगातील सर्वात खोल पूल म्हणून ओळखला जाणार आहेच, पण त्याशिवाय पूलमधील सर्वाधिक खोलीमध्ये तरणपटू पोहत असताना पाहण्याची संधी इतरांना मिळावी यासाठी या पूलमध्ये ‘अंडरवॉटर स्पेक्टेटर टनेल्स’, म्हणजेच प्रेक्षकांसाठी खास टनेल्स बनविण्यात येत आहेत. यामुळे स्वतः पाण्यामध्ये न उतरता ही पूलमध्ये तरणपटू पोहत असताना पाहणे प्रेक्षकांना शक्य होणार आहे. त्याशिवाय हा पूल ज्या ठिकाणी बनविला जात आहे, तिथे जवळच, तऱ्हे-तऱ्हेचे कार्यक्रम आयोजित करता यावेत यासाठी ट्रेनिंग सेन्टर्स, कॉन्फरन्स रूम्स, आणि पाहुण्यांच्या मुक्कामासाठी हॉटेल रूम्स असून, या सर्व ठिकाणांची रचना करताना पूलचा उत्तम व्ह्यू दिसेल याची काळजी घेण्यात आली आहे.

मात्र जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल ही उपाधी ‘डीपशॉट पूल’ च्या नावे काही काळापुरतीच राहण्याची शक्यता आहे, कारण २०२० साली इंग्लंडमध्ये बनत असलेल्या पन्नास मीटर खोलीच्या स्विमिंग पूलचे काम पूर्ण होत आहे. त्यानंतर हा पूल जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल ठरणार आहे. या पूलला ‘ब्ल्यू अबिस’ नावाने संबोधले जाणार असून, प्रोफेशनल डायव्हर्स, एरोस्पेस कॅम्युनिटीज आणि मरीन रिसर्चर्स करिता खास या पूलचे निर्माण करण्यात येत आहे.

Leave a Comment