जागतिक आरोग्य संघटनेची चीनच्या Sinopharm लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी


नवी दिल्ली : चीनच्या सिनोफार्म कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे. सिनोफार्म ही चीनची पहिलीच कोरोना लस आहे, जिला या प्रकारची मंजुरी मिळाली आहे. या आधीच जवळपास 42 देशांत या लसीचा वापर केला जात असून या लसीद्वारे लाखो जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.


सिनोफार्म ही गैर-पाश्चिमात्य असणारी पहिलीच लस आहे की ज्याच्या वापराला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे. या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्यायची की नाही यासाठी जागतिक आरोग्य संघनटेने एक समिती स्थापन केली होती.


जगभरातीस गरीब देशांत संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून कोरोनाचे लसीकरण करण्यात येत आहे. चीनच्या सिनोफार्म या लसीच्या वापराला मंजुरी दिल्यानंतर आता या लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती मिळणार असल्यामुळे लाखो लोकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.


जागतिक आरोग्य संघटनेने या आधी फायझर आणि बायोएनटेकने बनवलेल्या लसीसोबतच एस्ट्राझेनेका, जॉन्सन अॅन्ड जॉन्सन तसेच मॉडर्नाने उत्पादित केलेल्या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. त्यानंतर सिनोफार्म ही जगातील सहावी लस आहे जिच्या आपत्कालीन वापरास आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे. आतापर्यंत जगभरातील 42 देशांमध्ये चीनची सिनोफार्म ही लस वापरण्यात आली आहे.