सुट्टीच्या दिवसांत मुलांनाही करून घ्या घरकामामध्ये सहभागी


सध्या मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. अशा वेळी मुलांच्या शाळांचे वेळापत्रक, अभ्यास, इतर क्लासेसचे रुटीन सांभाळण्याची कसरत जरी थोड्या काळापुरती का होईना, पण कमी झाली असली, तरी सुट्ट्यांच्या काळामध्ये मुले घरामध्ये असताना त्यांना कंटाळा न येऊ देता त्यांचे मन कसे गुंतवून ठेवायचे यासाठी मार्ग देखील समस्त मातांनाच शोधावा लागत असतो. मुले घरामध्ये आहेत म्हटले, की पसारा, काम जास्त असतेच. अशा वेळी मुलांना रोजच्या घरकामामध्ये सहभागी करून घेतल्याने मुलांना घरातील लहान मोठ्या कामांचा, जबाबदारीचा परिचय होतो आणि घरकामामध्ये मदतही होते. सुरुवातीला मुलांनी घरकामामध्ये हातभार लावण्याचा कंटाळा केला, त्यांनी करण्याच्या कामामध्ये त्यांचा रस उत्पन्न होण्यासाठी प्रयत्न केले असता, मुले ही आनंदाने घरकामामध्ये सहभागी होत असल्याचे, तज्ञ ‘parenting’ एक्स्पर्ट्स म्हणतात. मात्र यामध्ये लक्षात घेण्यासारखी मुख्य गोष्ट अशी, की कामामध्ये मुलांच्या हातून काही चूक झाली, तर त्यासाठी मुलांना रागाविणे योग्य नाही. तसेच आपण एखादे काम जितके नीटनेटकेपणाने करू ते काम मुलेही सुरुवातीलाच तितक्याच नेटकेपणाने करतील अशीही अपेक्षा अवाजवी ठरत असते. मुले एखादे काम मनापासून आणि जबाबदारीची जाणीव ठेऊन करीत आहेत हीच बाब अतिशय महत्वाची आहे.

मुलांना घरकामामध्ये सहभागी करून घेताना काही गोष्टींचा विचार करणे अगत्याचे आहे. काही कामांची सवय मुलांना अगदी लहान वयापासून लावता येऊ शकते. तीन ते चार वर्षे वयाच्या मुलांना स्वतःची खेळणी स्वतः उचलून ठेवणे, स्वतःचे शूज उचलून ठेवणे. स्वतःचे वापरलेले कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन जवळ किंवा धुण्याच्या बादलीत नेऊन टाकणे, अशा कामांची सवय लवकरात लवकर लावणे फायद्याचे ठरते. मोठ्या मुलांना घरातील पुस्तके, वर्तमानपत्रे जागेवर ठेवणे, स्वतःच्या कपड्यांच्या घड्या स्वतः घालणे, इत्यादी कामे शिकविली जाऊ शकतात. दहा वर्षांच्या पुढील मुलांना घरातील झाडांना पाणी घालणे, स्वतःच्या कपड्यांची, पुस्तकांची मांडणी व्यवस्थित करणे, दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःचा बिछाना आवरून ठेवणे, घरामध्ये काही सामान आणले गेल्यास त्याची मांडणी करण्यास मदत करणे अशी कामे सोपविली जाऊ शकतात. त्याशिवाय मुलांच्या आवडीप्रमाणे त्यांना कामे दिली गेल्याने ती कामे मुले मनापासून करतात, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. काही मुलांना लहानपणापासून स्वयंपाकामध्ये रुची असते. अशा वेळी स्वयंपाकघरातील लहान सहान कामांमध्ये मुलांची मदत घेता येऊ शकते.

मुलांना घरकामामध्ये सहभागी करून घेताना त्यांची आवड कशामध्ये आहे, त्यांना कोणत्या कामामध्ये रस वाटेल याचा विचार करून मगच काम नेमून द्यावे. मुलांना कामाची सवय नसेल, तर ते काम पूर्ण होण्यासाठी वेळ जास्त लागत असतो. अशा वेळी आपण संयम राखावा आणि मुलांनी कामे आवरती घ्यावीत म्हणून घाई करू नये. एखादे काम मुलांना सोपविल्यानंतर ते काम कसे करायचे याची प्राथमिक माहिती मुलांना द्यावी, आणि त्यानंतर मात्र काम पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी मुलांवर सोपवावी. त्यासाठी मुलांना सतत सूचना देण्याचा, त्यांच्या मागे मागे फिरण्याचा मोह टाळावा. काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर मुलांना शाबासकी आणि प्रोत्साहन देण्यास विसरू नये.

Leave a Comment