या जगात अशाही महागड्या वस्तू


गाठीशी भरपूर पैसा असला, की जगातील हवी ती वस्तू विकत घेता येते. सामान्य माणूस विचारही करू शकत नाही इतकी किंमत मोजून वस्तू विकत घेणारी हौशी धनाढ्य मंडळी या जगामध्ये अनेक आहेत. खरे तर या वस्तू तशा आपल्याला ऐकून फारशा विशेष वाटत नसल्या तरी या वस्तूंशी निगडित ब्रँड्स, या वस्तूंशी निगडीत परंपरा यांमुळे या गोष्टींची किंमत सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडची आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर स्वित्झर्लंड येथील ‘इंस्टीट्युट ला रोसी’ या शैक्षणिक संस्थेचे देता येईल. या शाळेची एका वर्षाची फी १३०,५०० डॉलर्स असून, जगातील काही अतिधनाढ्य असामींची मुले या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात. या शाळेमध्ये एकूण चारशे विद्यार्थी असून, नव्वद शिक्षक आहेत. ही संस्था १८८० साली स्थापित झाली असून स्वित्झर्लंडमधील सर्वात नामवंत आणि प्राचीन आंतरराष्ट्रीय बोर्डिंग स्कूल्स पैकी एक आहे. मोनॅको, बेल्जियम, इतिप्त, इराणसहित अनेक देशांच्या शाही परिवारांतील सदस्यांनी या संस्थेतून शिक्षण घेतले आहे.

विंचू या प्राण्याची अनेक संस्कृतींमध्ये पूजा केली जात असली, तरी बहुतेक ठिकाणी मात्र अतिशय विषारी प्राणी म्हणून या प्राण्याबद्दल भय आढळून येते. पण अलीकडच्या काळामध्ये झालेल्या संशोधनाच्या अनुसार विंचवाच्या विषात असलेले क्लोरोटॉक्सिन हे मनुष्याच्या शरीरातील कर्करोगग्रस्त कोशिका ओळखू शकणारे असल्याचे निदान झाले असल्याचे तसेच या विषामध्ये असलेली रसायने मलेरियाचा समूळ नाश करू शकणारी असल्याचे निदान झाले आहे. आणखी कोणकोणत्या बाबतीत विंचवाचे विष उपयोगी ठरू शकते आणि त्याचा वापर कसा करता येईल या बद्दल संशोधन सुरु असले, तरी या संशोधनासाठी लागणारे विंचवाचे विष मात्र सहज उपलब्ध नाही. एक विंचू एका वेळी एकाच थेंब विष उत्पन्न करू शकणारा असल्याने संशोधनाच्या उद्देशाने हे विष पर्याप्त मात्रेमध्ये उपलब्ध नाही. त्याशिवाय विंचवापासून हे विष मिळविण्याचे काम तज्ञांना आपल्या हाताने करावे लागत असल्याने हे काम तसे अत्यंत धोकादायकही आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विंचवाच्या सुमारे साडे तीन लिटर (एक गॅलन) विषाची किंमत ३९,०००,००० मिलियन डॉलर्स आहे.

ब्रूक बॉंडच्या कंपनीच्या ‘पीजी टिप्स’ नामक ब्रँडच्या टी बॅग्स सर्वात किंमती समजल्या जातात. या एका टी बॅगची किंमत तब्बल १४,००० डॉलर्स होती. ब्रूक बॉंड कंपनीच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त २००५ साली पीजी टिप्सच्या वतीने प्रत्येकी २८० हिरे जडविलेल्या टी बॅग्स बाजारात आणल्या गेल्या होत्या. या टी बॅग्सच्या विक्रीत्तून गोळा झालेली सर्व रक्कम इंग्लंडमधील मॅनचेस्टर चिल्ड्रन्स हॉस्पिटलला देणगी म्हणून देण्यात आली. जपानमध्ये तयार करण्यात आलेला ‘हॅपी हॅकिंग कीबोर्ड’ हा जगातील सर्वात महागडा कॉम्प्युटर कीबोर्ड असून, याची किंमत तब्बल ४,२४० डॉलर्स आहे. या कीबोर्डवरील सर्व कीज् सोन्याचा मुलामा चढविलेल्या असून, हा कीबोर्ड फुजीत्सू कंपनीच्या वतीने सादर करण्यात आला होता.

आजकाल सर्रास वापरल्या जाणाऱ्या विविधरंगी कॉन्टॅक्ट लेन्सेस सध्याच्या काळातली लोकप्रिय फॅशन अॅक्सेसरी आहे. मात्र एका भारतीय ऑप्टोमेट्रीस्टने चक्क हिऱ्याच्या लेन्सेस तयार केल्या आहेत. पत्नीने सोन्याचा दात बनवून घेतल्यानंतर त्यापासून प्रेरणा घेत हिऱ्याच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस बनविण्याची कल्पना आपल्याला सुचली असल्याचे या ऑप्टोमेट्रीस्टचे म्हणणे आहे. या लेन्सेसच्या जोडीपैकी प्रत्येक लेन्सचे वजन पाच ग्राम असून, या लेन्सेस वापरण्यास संपूर्णपणे सुरक्षित असल्याचे समजते. या लेन्सेस्च्या जोडीची किंमत पंधरा हजार डॉलर्स असून, अनेक हौशी मंडळी आवडीने या लेन्सेस खरेदी करतील असा विश्वास या ऑप्टोमेट्रीस्टना आहे.

जगातील सर्वात महाग चीझ हे बकरीच्या, म्हशीच्या किंवा गायीच्या दुधापासून तयार केले जात नसून, गाढविणीच्या दुधापासून तयार केले जाते.
‘पुले चीझ’ या नावाने ओळखले जाणारे हे चीझ सर्बिया आणि मॉन्टेनेग्रो या ठिकाणी बनविले जात असून, या ठिकाणच्या स्थानिक ‘बाल्कन’ प्रजातीच्या गाढविणींच्या दुधापासून हे चीझ तयार केले जाते. ‘पुले चीझ’ची किंमत बाजारामध्ये प्रती पाऊंड सहाशे डॉलर्स असून, एक किलो पुले चीझ बनविण्यासाठी पंचवीस लिटर दुधाची आवश्यकता असते. त्यामुळे हे चीझ बाजारामध्ये सर्रास उपलब्ध नाही, आणि असलेच तरी सामान्य माणसाला न परवडणाऱ्या दरात उपलब्ध असते.

Leave a Comment