तुम्ही चाखून पाहणार का ‘मॅगोट आईस्क्रीम’ ?


आईस्क्रीम म्हटले, की अनेक चविष्ट फ्लेवर्स आपल्या मनामध्ये रुंजी घालू लागतात. लोकप्रिय व्हॅनीला, आंबा, स्ट्रॉबेरी इत्यादी ओळखीच्या फ्लेवर्ससोबतच आजकाल नारळाचे आईस्क्रीम, जांभळाचे, सीताफळाचे आईस्क्रीम इत्यादी फ्लेवर्सही लोकप्रिय होत आहेत. फळे आणि भाज्यांचे फ्लेवर्स असलेली आणि त्यांचा वापर करून बनविलेली आईस्क्रीम्स आपल्या परिचयाची असली, तरी चक्क ‘मॅगोट्स’ पासूनही आईस्क्रीम बनविण्याची कल्पना कोणी तरी प्रत्यक्षात आणू शकते हे काहीसे अविश्वसनीय आहे. एखाद्या पदार्थावर माश्या बसल्यानंतर माश्या त्या पदार्थावर अंडी घालतात. या अंड्यांमधून ज्या कृमी बाहेर येतात, त्यांना ‘मॅगोट्स’ म्हटले जाते. थोडक्यात माश्यांनी घातलेल्या अंड्यांच्या मधून बाहेर आलेल्या या आळ्या असतात. या आळ्यांचा वापर करून एका दक्षिण आफ्रिकी व्यावसायिकाने हे खास ‘मॅगोट आईस्क्रीम’ तयार केले आहे.

अलीकडच्या काळामध्ये पाश्चात्य देशांमध्ये अनेक तऱ्हेचे किडे, इतर अन्नपदार्थांना पर्याय म्हणून आहारामध्ये समाविष्ट केले जात असल्याने पारंपारिक पद्धतीने दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर करून आईस्क्रीम आणि तत्सम पदार्थ बनविले जाण्यापेक्षा, प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेल्या कृमींचा वापर आईस्क्रीम बनविण्यासाठी केला गेला असल्याचे या व्यावसायिकाचे म्हणणे आहे. ‘गोर्मे ग्रब’ या कंपनीने हे आईस्क्रीम तयार केले असून, यासाठी कृमी आणि इतर नैसर्गिक पदार्थांवर प्रक्रिया करून, त्यानंतर त्यामध्ये कोको आणि मध मिसळून हे आईस्क्रीमचे मिश्रण तयार केले जाते. या कृमी तयार होण्यासाठी जागा, पाणी आणि अन्न अतिशय कमी प्रमाणात लागत असल्यामुळे या कृमिंचे उत्पादन अधिक सोपे असल्याचेही या कंपनीचे म्हणणे आहे. त्याशिवाय या कृमिंमध्ये इतर पदार्थांच्या मानाने प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि क्षार अधिक असल्याने हे पोषकही असल्याचे सांगून, त्यापासून बनविलेले आईस्क्रीम आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment