हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून अवतरले हे खास ‘हॉस्टेल स्नॅक्स’


महाविद्यालयीन जीवनामध्ये हॉस्टेलमध्ये राहण्याची जशी मजा न्यारी, तसे हॉस्टेल जीवनामध्ये अडचणी देखील अनेक. सर्वात मोठी अडचण असते ती अशी, की हॉस्टेलमध्ये जेवणाच्या वेळांचे नियम काटेकोरपणे पाळले जात असल्यामुळे मनात येईल तेव्हा काही तरी खाणे येथे राहून शक्य होत नसते. जवळपासच्या कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये फारशी व्हरायटी नसते, आणि सतत बाहेर खाणे खिशाला परवडणारे नसते. म्हणूनच ‘मॅगी इन्स्टंट नूडल्स’ सारखे खाद्यपदार्थ हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मंडळींमध्ये खूपच लोकप्रिय ठरले. पण काही काळापूर्वी काही कारणांमुळे ‘मॅगी’ बाजारातून गायब झाले, आणि हॉस्टेलवासियांची मोठीच पंचाईत झाली. तेव्हा ‘गरज ही शोधाची जननी असते’ हे विधान सार्थ ठरवत विदयार्थी मंडळींनी आपल्या कल्पकतेचा वापर करून असे काही पदार्थ तयार केले, की ‘मॅगी’ बाजारामध्ये परतल्यानंतरही या खास ‘हॉस्टेल स्नॅक्स’ची लोकप्रियता जराही कमी झाली नाही. आजच्या काळामध्ये ही हे हॉस्टेल स्नॅक्स बहुतेक सर्वच हॉस्टेल्समध्ये आवर्जून हौशीने बनविले आणि चवीने खाल्ले जात असतात.

यातील सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे ‘चिप्स आणि आलू भुजिया सँडविच’. हा पदार्थ आयआयटी दिल्ली येथील हॉस्टेल्सची खासियत आहे. दोन ब्रेडच्या स्लाईसेसमध्ये भरपूर बटाट्याचे वेफर्स आणि आलू भुजिया घालून त्यावर टोमॅटो सॉस घालून हे सँडविच तयार केले जाते. आयआयटी दिल्लीच्या हॉस्टेल्समध्ये हा पदार्थ विद्यार्थ्यांचे आवडते ‘पार्टी फूड’ आहे. त्याचप्रमाणे दोन बिस्किटांच्या मध्ये जॅम पसरून बनविलेला बिस्कीट केकही लोकप्रिय हॉस्टेल स्नॅक आहे.

खारे शेंगदाणे एका भांड्यामध्ये घेऊन त्यावर थोडासा चिरलेला कांदा व मिरची घातली, आणि चवीला लिंबाचा रस घातला, की चविष्ट ‘पीनट मसाला’ तयार. हा पदार्थ ब्रेडसोबत खाल्ला जात असतो. तर कधी चमचमीत तिखट शेवेमध्ये चिरलेला कांदा घालून बनविलेला ‘भुजिया मिक्स’ ही ही लोकप्रिय हॉस्टेल स्नॅक आहे. फळांच्या फोडी चिरून त्यावर चाट मसाला टाकून बनविलेल्या ‘फ्रूट चाट’चा पर्यायही हॉस्टेल्समध्ये लोकप्रिय असतो.

Leave a Comment