कोण आहे ‘प्रिन्सेस क्लियोपात्रा सुपरचिल’ ?


प्रिन्सेस क्लियोपात्रा सुपरचिल हे कुठल्याही अभिनेत्रीचे किंवा पॉपस्टारचे नाव नाही. हे नाव आहे लिव्हरपूल, इंग्लंड येथील अत्यंत लाडात वाढलेल्या कुत्रीचे. प्रिन्सेस क्लियोपात्रा ही स्टॅफर्डशायर बुल टेरियर जातीची कुत्री असून, मालक अँथनी वेल्श याने तिला अत्यंत लाडाकोडाने वाढविलेले आहे. प्रिन्सेस क्लियोपात्रा ही केवळ लिव्हरपूलमधेच नाही, तर संपूर्ण ब्रिटनमध्ये, अत्यंत लाडाने वाढविलेली कुत्री म्हणून ओळखली जाते. अशा या क्लियोपात्राला सोबत फिरायला नेण्यासाठी तिच्या मालकाने खास सायकल बनवून घेतली असून, त्यावर प्रिन्सेसला बसण्यासाठी खास बास्केट लावण्यात आली आहे. ही सायकल इतकी आगळी वेगळी दिसते, की त्यामुळेच प्रिन्सेस क्लियोपात्रा आणि तिच्या मालकाला संपूर्ण लिव्हरपूलमधे ओळख प्राप्त झाली आहे.

प्रिन्सेस क्लियोपात्रासाठी अँथनी सर्व प्रकारच्या अॅक्सेसरिज उत्साहाने खरेदी करीत असून, क्लियोपात्राच्या संग्रही तब्बल १७५ निरनिराळ्या प्रकारचे गॉगल्स आहेत. प्रिन्सेस क्लियोपात्राचे स्वतःचे फेसबुक पेजही असून त्यावर क्लियोपात्राची अनेक छायाचित्रे वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. अलीकडच्या काळामध्ये मात्र क्लियोपात्रा आणि तिच्या मालकासमोर एक मोठी अडचण उभी राहिली. प्रिन्सेस करिता तिच्या मालकाने खास बनवून घेतलेली सायकल चोरीला गेली असून, त्यामुळे प्रिन्सेसचे बाहेर ऐटीत फिरायला जाणे बंद झाले आहे. प्रिन्सेसच्या फेसबुक पेजवरून सायकल चोरीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले असून, ज्याला कोणाला ही सायकल कुठे आहे, किंवा ती कोणी चोरली असावी याबद्दल काही माहिती असल्यास त्याने ही माहिती अँथनीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन या सोशल मिडियावरील पोस्टमध्ये करण्यात आले आहे.

चार मे रोजी ही सायकल जिथे उभी होती तिथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून ही सायकल नेमकी चोरीला कधी गेली याची माहिती मिळाली असली, तरी ही कोणी चोरली असावी याचा मात्र काहीच थांगपत्ता लागू शकलेला नाही. या चोरीच्या घटनेचे सविस्तर वृत्त प्रिन्सेसच्या सोशल मिडीया पेजवरून प्रसिद्ध झाले असून, ही सायकल परत आल्यानंतरच फिरायला बाहेर पडण्यासचा आनंद पुन्हा आपल्याला मिळू शकणार असल्याचे प्रिन्सेसच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्रिन्सेस क्लियोपात्राला जेव्हा अँथनीने घरी आणले, तेव्हा ती तेरा महिन्यांची होती. त्यावेळी ती सतत घाबरलेली, भेदरलेली दिसत असून, त्यावरूनच त्यापूर्वी तिचे आयुष्य खूपच हालाखीचे असल्याचे स्पष्ट होत असल्याचे अँथनी म्हणतो. अँथनीसोबत मात्र प्रिन्सेस सुपरचिलचे आयुष्यच बलाडून गेले. तिच्या पालन पोषणासाठी आजवर अँथनीने तब्बल ४०,००० पौंड खर्च केले असून आजच्या काळामध्ये प्रिन्सेसकडे साठ निरनिराळे पोशाख आणि तब्बल १७५ बहुढंगी सनग्लासेस आहेत.

Leave a Comment