घरासाठी फर्निचर खरेदी करताना…


आजकाल नवीन घरासाठी किंवा राहत्या घरासाठी नवे फर्निचर खरेदी करायचे असल्यास आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. एकतर आपल्या आवश्यकतेनुसार इंटीरियर डिझायनरकडून फर्निचर तयार करवून घेणे हा एक पर्याय असतो, पण ही प्रक्रिया खूप वेळ घेणारी असते. आजच्या काळामध्ये इतका वेळ देणे शक्य नसल्याने तयार फर्निचर विकत घेण्याचा पर्याय लोक अधिक पसंत करू लागले आहेत. त्यातून फर्निचरची निवड आणि खरेदी ऑनलाईन उपलब्ध झाल्याने फर्निचर खरेदी दहा दुकाने न हिंडावी लागता, घरच्याघरी बसून करता येणे शक्य झाले आहे. आजकाल ऑनलाईन फर्निचर पुरविणारे अनेक नामवंत ब्रँड्स अस्तित्वात असून, यांच्यातर्फे पुरविले जाणारे फर्निचर उत्तम प्रतीचे आणि असेम्बल करण्यास सोपे असते. तसेच आपल्या आवडीप्रमाणे पारंपारिक किंवा आधुनिक धाटणीचे फर्निचरही आपल्याला सहज उपलब्ध होत असते.

पण कधी कधी मात्र फर्निचरमध्ये अगणित पर्याय उपलब्ध असल्याने आपला गोंधळ उडण्याची शक्यता असते. आपल्याला ऑनलाईन वेबसाईटवर किंवा एखाद्या फर्निचर स्टोरमध्ये खूपच आवडलेला एखादा फर्निचर आयटम घरी आणल्यानंतर आपला अपेक्षाभंगही करू शकतो. असे होऊ नये म्हणून आपल्या घरासाठी नवे फर्निचर घेण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे अगत्याचे आहे. सर्वप्रथम ज्या रूमकरिता आपल्याला फर्निचर घ्यायचे असेल, त्या खोलीचा आकार, साईझ लक्षात घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ जर बेडरूमसाठी डबल बेड घ्यायचा असेल, आणि रूमचा साईझ लहान असेल, तर अशा खोलीसाठी किंग साईझ डबलबेड घेतल्याने रूममध्ये इतरत्र वावरण्यास जागा कमी पडू शकते. त्यामुळे फर्निचरची निवड करताना रूमचा साईझ लक्षात घेणे आवश्यक ठरते.

घरासाठी फर्निचर खरेदी करताना त्या त्या खोलीतील रंगसंगती विचारात घेतली जाणे आवश्यक आहे. फर्निचरची कलर स्कीम ही रूमच्या भिंतींचे, पडद्यांचे रंग, यांचा विचार करून निवडली जावी. त्याचप्रमाणे सर्व फर्निचर एकाच खोलीमध्ये मांडणे टाळावे. फर्निचर उत्तम, पण मोजके असल्याने खोली प्रशस्त आणि हवेशीर वाटते. सर्व फर्निचर एकाच खोलीमध्ये मांडल्याने खोलीमध्ये मोकळेपणाने वावरणे कठीण होते, आणि अशा वेळी ती खोली एखाद्या स्टोररूमप्रमाणे भासण्याची शक्यताच अधिक असते. आपल्या घरातील फर्निचर, त्याची आकर्षक मांडणी हे आपल्या घराची आगळी ओळख निर्माण करणारे असते. त्यामुळे फर्निचर खरेदी करताना घाई करू नये. आपल्याला आवडणारा प्रत्येक फर्निचर आयटम कुठे ठेवला की कसा दिसेल याची पूर्ण कल्पना करून मगच फर्निचर निवडावे.

फर्निचर खरेदी करताना सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे आपले बजेट. आजकाल बाजारामध्ये ‘बजेट फ्रेंडली’ असे अनेक फर्निचर ब्रँड्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला त्यातून योग्य निवड करण्यासाठी भरपूर वाव असतो. अनेक ऑनलाईन वेबसाईट अशाही आहेत, ज्यांवर उत्तम प्रतीचे सेंकड हँड फर्निचर रास्त दरामध्ये उपलब्ध असते. आपल्याला एखाद्या फर्निचर आयटमवर फार जास्त खर्च करायचा नसेल, तर हाही पर्याय आजमावून पाहण्याचा विचार जरूर करावा. त्याचप्रमाणे आपल्या परिवारामध्ये किती सदस्य आहेत, आपल्याकडे पाहुणे मंडळींचे येणे जाणे किती असणार आहे, या गोष्टींचा विचार करून डायनिंग टेबल किंवा सोफा यांसारख्या फर्निचर आयटम्सच्या खरेदीचा निश्चित निर्णय घ्यावा.

Leave a Comment