असे होते आल्बर्ट आईन्स्टाईनचे व्यक्तिगत आयुष्य


प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख-दुःखे, अडचणी या येतच असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही खासगी दुःखे, तऱ्हे-तऱ्हेचे चांगले-वाईट अनुभव, संघर्ष, हे असतातच. आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी कमावतो, तशा अनेक गोष्टी गमावतोही. आयुष्याची हीच रीत असते, आणि थोरा-मोठ्यांची आयुष्येही याला अपवाद नाहीत. ‘थियरी ऑफ रिलेटिव्हिटी’ मांडणाऱ्या प्रख्यात शास्त्रज्ञ आल्बर्ट आईनस्टाईन यांचे व्यक्तिगत आयुष्यही अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. भौतिकशास्त्रामध्ये ज्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक शोध लावले गेले, कधीही कोणाला न उलगडणारी वैज्ञानिक रहस्ये ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने सहज सोडविली, अशा आईनस्टाईनचे व्यक्तिगत आयुष्य मात्र अत्यंत गुंतागुंतीचे होते.

आईनस्टाईन यांनी त्यांच्या आयुष्यभरामध्ये दोन विवाह केले, पण त्यांना झालेली तीनही अपत्ये त्यांच्या पहिल्या विवाहसंबंधांतून जन्मलेली होती. आईनस्टाईनची पहिली पत्नी मिलेवा मारिक आणि आईनस्टाईनची भेट झ्युरिक पॉलिटेक्निक विद्यापीठात झाली. दोघेही येथे भौतिकशास्त्राचे शिक्षण घेत होते. मिलेवा आईनस्टाईनपेक्षा वयाने चार वर्षे मोठी होती. विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्राचे शिक्षण घेणारी त्या काळी ती एकमेव महिला विद्यार्थी होती. मिलेवा अतिशय बुद्धिमान होती. तिच्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेनेच आईन्स्टाईन यांना सर्वप्रथम आकृष्ट करून घेतले. मिलेवाने देखील आईनस्टाईन यांच्या संशोधनकार्यामध्ये महत्वाचा वाटा उचलला. १९०२ साली मिलेवाला मुलगी झाली, पण ती वर्षभरातच मरण पावली. त्यानंतर १९०३ साली आईनस्टाईन आणि मिलेवाने विवाह करण्याचा निर्णय घेतला.

अल्बर्ट आणि मिलेवाला हान्स अल्बर्ट आणि एदुआर्द ही दोन मुले झाली. आईनस्टाईन आणि मिलेवा जरी उत्तम भौतिकशास्त्रज्ञ असले, तरी त्यांचे वैवाहिक आयुष्य मात्र फारसे समाधानाचे नव्हते. १९१२ साली आईनस्टाईन यांनी आपलीच नातलग असलेल्या एल्सा आईनस्टाईन लोवेनथाल हिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. १९१९ आली आईनस्टाईन आणि मिलेवा वेगळे झाले, आणि त्यांनतर आईनस्टाईन यांनी त्याच वर्षी एल्साशी विवाह केला. नाझी शासनाच्या भीतीने या दाम्पत्याने १९३०च्या दशकामध्ये अमेरिकेला स्थलांतर केले. या विवाहसंबंधांतून आईनस्टाईन यांना अपत्य झाले नाही. याच काळादरम्यान एल्साशी विवाहबद्ध असतानाच आईन्स्टाईन यांचे अनेक विवाहबाह्य संबंध होते. १९३६ साली एल्साचा मृत्यु झाला.

आईनस्टाईनची दोन्ही मुले मिलेवाजवळ राहत असली, तरी त्यांच्या पालन पोषणाची सर्व आर्थिक जबाबदारी आईनस्टाईन यांनी घेतली होती. तसेच पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आईनस्टाईन सतत आपल्या मुलांच्या संपर्कात राहत असत. हान्स आल्बर्ट याचे बालपण सर्वसाधारण मुलांप्रमाणेच सामान्य असले, तरी आपल्या वडिलांशी मात्र तो मनाने जवळ कधीच येऊ शकला नाही. हान्सने देखील आपल्या माता-पित्यांप्रमाणे झ्युरिक विद्यापीठामध्ये प्रवेश मिळविला आणि सिव्हील इंजिनीअरिंग मध्ये पदवी मिळविली. त्यानंतर १९३८ साली हान्सने विज्ञानामध्ये डॉक्टरेट मिळविली. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला साउथ कॅरोलिना आणि त्यानंतर कॅलिफोर्नियामधील युसी बर्कली येथे प्राध्यापक म्हणून हान्स कार्यरत होते.

आईनस्टाईनचा दुसरा मुलगा एदुआर्द यांच्याबद्दल मात्र फारसे स्पष्ट उल्लेख सापडत नाहीत. एदुआर्द हे लहानपणापासूनच अशक्त प्रकृतीचे होते. मानसशास्त्रामध्ये त्यांना रुची होती. सिग्मंड फ्रॉइड यांचे मानसशास्त्रातील कार्य त्यांना अत्यंत प्रभावित करीत असे. अभ्यासामध्ये हुशार असलेल्या एदुआर्द यांना मानसोपचारतज्ञ बनण्याची इच्छा होती. वयाच्या विसाव्या वर्षी एदुआर्द यांना स्किझोफ्रेनिया असल्याचे निष्पन्न झाले, आणि त्यानंतर त्यांचा हा आजार बळावू लागल्यानंतर त्यांना नाईलाजासत्व मानसोपचार केंद्रामध्ये भर्ती करण्यात आले. या ठिकाणी एदुआर्दवर करण्यात आलेल्या उपचारांमुळे त्यांची परिस्थिती आणखीनच खालावली. किंबहुना या मनोरुग्णालयामध्ये एदुआर्द यांना देण्यात आलेल्या इलेक्ट्रो-कन्व्हल्सिव थेरपीमुळे त्यांचा कायमस्वरूपी स्मृतीभ्रंश झाल्याचे उल्लेख सापडतात. मनोरुग्णालयामध्ये काही काळ राहिल्यानंतर एदुआर्द आपल्या आईच्या घरी परतले, आणि तेव्हापासून मिलेवानेच त्यांची देखभाल केली. मिलेवाच्या मृत्युनंतर एदुआर्दला पुन्हा एकदा मनोरुग्णालयात जावे लागले, आणि १९६५ साली त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते तिथेच राहिले. आईनस्टाईन यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांचा आणि एदुआर्दचा पत्रव्यवहार सुरु राहिला असला, तरी या काळादरम्यान दोघे कधी एकमेकांना प्रत्यक्ष भेटले मात्र नाहीत.

Leave a Comment