घरातील भिंतींवर लावण्यात येणारी चित्रे असावीत अशी, म्हणते वास्तूशास्त्र


घर असो, वा कार्यालय ते व्यवस्थित, नीटनेटके आणि सुंदर सजविलेले असले, की तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मन प्रसन्न करीत असते. घराच्या किंवा कार्यालयाच्या भिंती सजविण्यासाठी केवळ भिंतींना दिलेला रंगच महत्वाचा नाही, तर भिंतींवर लावण्यात येणारी चित्रे, पेंटींग्ज यांमुळे ही एकंदर सर्वच घर किंवा कार्यालय शोभिवंत होत असते. आजकाल बाजारामध्ये तऱ्हेतऱ्हेची पेंटींग्ज, वॉल हँगिन्ग्ज सहज उपलब्ध असल्याने आपण आपल्या आवडीनुसार पेंटींग्ज निवडू शकतो. मात्र यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी, की आपण आपल्या घरामध्ये किंवा कार्यालयामध्ये लावत असलेल्या पेंटींग्जचे निश्चित सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव त्या वास्तूवर आणि पर्यायाने आपल्या आयुष्यावर पडत असल्याचे वास्तुशास्त्रामध्ये म्हटले आहे. म्हणूनच घरामध्ये किंवा कार्यालयामध्ये लावली जाणारी पेंटींग्ज कशाप्रकारची असावीत, यावर वास्तूशास्त्र मार्गदर्शन करते.

वास्तूशास्त्राच्या अनुसार एखाद्या ठिकाणी लावलेले पेंटिंग ज्या भावनेशी मिळतेजुळते असते, तसाच त्या चित्राचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणूनच घरामध्ये किंवा कार्यालयामध्ये आनंदाची भावना उत्पन्न करणारी आणि मनःशांती प्रदान करणारी चित्रे लावली जावीत असे वास्तूशास्त्र म्हणते. त्याचबरोबर ही चित्रे योग्य दिशेला लावली गेल्यानेही घरामध्ये सकारात्मक उर्जेचे संचरण रहाते. घरातील पूर्वेकडे सूर्योदयाची किंवा देवादिकांची चित्रे लाविली गेल्याने घरातील सकरात्मक उर्जेची वृद्धी होते, आणि घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते. फळे, फुले, हिरवेगार वृक्ष, आणि सुंदर निसर्गचित्रे नव्या जीवनाचे आणि संपन्नेतेचे प्रतीक आहेत. त्यामुळे अशी चित्रेही घरामध्ये पूर्वेला किंवा उत्तरेला लावली जावीत.

उत्तर दिशा कुबेराची दिशा असल्याने लक्ष्मी आणि गणपतींची चित्रे या दिशेला लावली जावीत. डोंगर, पर्वतरांगा, आणि तत्सम लँडस्केप्स दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावली जावीत. यामुळे घरातील व्यक्तींना मनोबल आणि आत्मविश्वासाची प्राप्ती होते. अशी चित्रे पूर्वेला लावणे टाळावे. पाणी, समुद्र, झरे, नद्या, सरोवरे, इत्यादी दर्शिविणारी चित्रे उत्तरेला किंवा पश्चिमेला लावण्यात आल्याने घरामध्ये समृद्धी नांदत असल्याचे वास्तूशास्त्र म्हणते. घरातील व्यक्तींना मानसिक शांती लाभावी या करिता घरातील एखाद्या दर्शनी भिंतीवर बुद्ध किंवा महावीर यांची चित्रे असावीत. ही चित्रे दक्षिण सोडून इतर कोणत्याही दिशेला लावली जावीत.

अनेकांच्या घरांमध्ये परिवारातील सदस्यांची छायाचित्रे लावली जातात. काही खास प्रसंगी काढलेले असे हे फॅमिली फोटो घरातील उत्तरेला, पूर्वेला किंवा उत्तर-पूर्वेला लावण्यात यावेत. यामुळे घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी राहते. घरामध्ये उत्तर दिशेला डॉल्फिन माशांचे चित्र व्यवसायात किंवा कामामध्ये प्रगतीचे कारक असते. धावत्या घोड्यांचे चित्र बल, विस्तार, आणि गतीचे प्रतीक असल्याने घरामध्ये हे चित्रही लावले जाऊ शकते. घरामध्ये युद्धाची रक्तरंजित दृश्ये दर्शविणारी, वैराण, उजाड भूमी, वाळलेली झाडे दर्शविणारी चित्रे लावू नयेत. त्याचप्रमाणे घरातील मृत व्यक्तींची छायाचित्रे देवघरामध्ये ठेवणे टाळावे. परिवारातील दिवंगत व्यक्तींची छायाचित्रे दक्षिण, पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम दिशांना लावली जावीत.

Leave a Comment