ब्रिटनला निर्यात होणारे कोविशिल्डचे ५० लाख डोस भारतातच वापरले जाणार

भारतात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे करोना लसीकरण सुरु झाले असले तरी देशात लसीची कमतरता आहे. कोविशिल्डचे उत्पादन पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट आणि सरकार नियामक संचालक प्रकाशकुमार सिंग यांनी या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून ब्रिटन ला निर्यात केले जाणारे ५० लाख लस डोस भारतात वापरण्याचे परवानगी मागितली असून केंद्राने त्याला अनुमती दिली आहे.

केंद्राने परवानगी देताना हे डोस देशातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात वाटण्यास संमती दिली असल्याचे समजते. सिरमने अॅस्ट्राजेनका शी केलेल्या करारानुसार हे ५० लाख डोस ब्रिटनला पाठविण्याची परवानगी २३ मार्च रोजी मागितली होती त्यावेळी या निर्यातीचा देशाच्या लसीकरणावर परिणाम होणार नाही असे सांगितले गेले होते.

पण या काळात देशात करोनाचा प्रसार खुपच वेगाने झाला तेव्हा या निर्यात होणाऱ्या लसीचा वापर देशातच करण्याचा निर्णय घेतला गेला असे समजते. केंद्राने राज्यांनी त्यांची लस कंपनीशी संपर्क साधून खरेदी करावी असे सांगितले होते. त्या नुसार काही राज्यांनी या लसीची खरेदी केली आहे.