महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरणाबाबतची नियमावली बदलणार!


मुंबई – १ मेपासून महाराष्ट्रासह देशभरात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार काही राज्यांनी लसींच्या उपलब्धतेनुसार हे लसीकरण सुरू केले. काही मोजक्या केंद्रांवर महाराष्ट्रात देखील त्याची सुरुवात करण्यात आली. पण, लसींचा तुटवडा आणि त्यातून लसीकरण केंद्रांवर होणारा गोंधळ लक्षात घेता, आता १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य सरकार लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील वेगवेगळे स्लॉट करून त्यानुसार लसीकरण करण्याची शक्यता आहे. वयोगट किंवा सहव्याधी यानुसार हे स्लॉट असू शकतात, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले आहेत.

कोरोना लसींचा साठा अपुरा असल्यामुळे लसीकरण केंद्रांवर लसींचा पुरवठा कमी प्रमाणात केला जात आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर १८ ते ४४ वयोगटासाठी मोजक्या केंद्रांवरच लसीकरण सुरू केल्यामुळे अशा केंद्रांवर या वयोगटातील नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. पण, त्याविषयी काही समस्या येत असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

ग्रामीण भागातील केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटासाठी त्याच भागातील लोक न जाता शहरांमधून ज्यांना तंत्रज्ञानाची जाण आहे, अशा लोकांनी कोविन अॅपवर नोंदणी करून केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घेतल्यामुळे स्थानिक भागात अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात मी बोललो आहे.

ही समस्या सोडवण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्लॉट द्यावे लागणार आहेत. मग वयोगटाचा किंवा कोमॉर्बिडिटीचा स्लॉट देता येईल. म्हणून ३५ ते ४४ या वयोगटातील लोकांना प्राधान्य देता येईल का? त्यातही सहव्याधी असलेल्यांना अधिक प्राधान्य देता येऊ शकेल. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचे टोपे म्हणाले.

दरम्यान, राज्यात लसीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रशियाची स्पुटनिक लस मागवण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राजेश टोपेंनी यावेळी दिली. रशियाची स्पुटनिक व्ही ही लस महाराष्ट्रात मागवण्यासाठी चर्चा सुरू असून त्यांच्याशी लसीच्या दरांबाबत बोलणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी ३८ पीएसए प्लांट लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, लसीकरणाविषयीही ताजी आकडेवारी दिली. १ कोटी ७३ लाख २१ हजार ०२९ लोकांचे राज्याने लसीकरण केले आहे. राज्याने १८ ते ४४ या वयोगटातील २ लाख १५ हजार २७४ लोकांचे लसीकरण केले आहे. त्याचबरोबर २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल आहेत. देशात ही सर्वाधिक संख्या आहे.

आपण हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्लांटच्या १५० हून जास्त ऑर्डर्स दिल्या आहेत. यातून ९५ ते ९८ टक्के शुद्धतेचा ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो. यामुळे लिक्विड ऑक्सिजनची मागणी कमी होऊ शकते. यातून ५३ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळू शकतो, असे टोपे म्हणाले.