महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये करोनाचे प्रमाण वाढले

देशभरात करोना प्रभावित राज्यात महाराष्ट्र आघाडीवर आहेच पण यावेळच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना करोनाची बाधा होण्याचे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक वाढले असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार १ ते १० वयोगटातील १,४७,४२० मुलांना करोना झाला आहे. हे संक्रमण मार्च आणि एप्रिल मध्ये अधिक वेगाने वाढल्याचेही दिसून आले आहे. मुंबई मध्ये लहान मुलांना करोना होण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे. बीएमसीच्या आकडेवारीनुसार गतवर्षी ० ते १० वयोगटातील ११०८० मुलांना करोना झाला होता आणि त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला होता. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागणाऱ्या मुलांची संख्या दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे. ११ ते २० वयोगटात करोना बाधितांची संख्या ३,३३,९२६ वर गेली आहे.

यामागे डिसेंबर जानेवारी मध्ये करोना संदर्भातील प्रतिबंध कमी झाल्यावर मोठ्या संखेने घराबाहेर पडलेले नागरिक अधिक जबाबदार आहेत असे तज्ञांचे मत आहे. मोठ्यांची चूक लहान मुलांना भोवल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण मुलांवर उपचार करण्याऱ्या डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार यावेळी मार्च एप्रिल मध्ये लहान मुलांतील करोना केस वाढल्या असल्या तरी तीन ते चार दिवसात बरीच मुले बरी होत आहेत.