नागपूरातील बंद एमएपीएलला पुनर्जीवित करण्याची ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची मागणी


मुंबई : नागपूर महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतील बंद असलेल्या महाराष्ट्र अँटिबायोटिक अँड फार्मास्युटीकल लिमिटेड (एमएपीएल) या औषध निर्मिती कंपनीला पुनर्जीवित करून त्याचे रूपांतर ऑक्सिजन व औषध निर्मिती युनिटसह जंबो कोव्हिड सेंटरमध्ये करण्याची विनंती राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ही कंपनी महाराष्ट्र सरकारने अधिग्रहित करावी, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात डॉ.राऊत यांनी एमएपीएलला पुनर्जीवित करण्याची योजनाही मांडली आहे.

राज्य सरकार व केंद्र सरकारच्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्या संयुक्त उपक्रमातून १९८० साली एमएपीएलची स्थापना करण्यात आली होती. तेथे जीवनावश्यक औषधे व जेनेरिक मेडिसीन्सची निर्मिती कऱण्यात येत असे. परंतु सन १९९५-९६ साली ही कंपनी तोट्यात आल्याने बंद करण्यात आली होती.

सध्या कोरोना महामारीने देशात सर्वत्र थैमान घातले असून बंद असलेल्या या औषध निर्मिती कंपनीच्या इमारतीत व जागेत अल्पावधीतच ऑक्सिजन व कोरोना आजारावरील प्रभावी औषधे जसे रेमडेसिवीर तसेच कोरोना प्रतिबंधक कोवॅक्सिन लसीची निर्मिती करणे शक्य आहे. सोबतच या कंपनीच्या इमारतीत कोरोना हॉस्पिटल अल्पावधीतच चालू करणे शक्य असल्याचेही डॉ.राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

महाराष्ट्र सरकारने एमएपीएलचे अधिग्रहण करून या कंपनीच्या परिसरात जंबो कोव्हिड सेंटर आणि डे केअर सेंटर, मोठ्या क्षमतेचे वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती केंद्र, रेमडेसिवीर आणि इतर जीवनरक्षक औषधांची निर्मिती करावी तसेच आत्मनिर्भर भारत मिशन ३.० अंतर्गत कोवॅक्सिन लसीची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी डॉ.राऊत यांनी आपल्या पत्रात केली आहे.

तोट्यात असलेल्या एमएपीएलचे नियंत्रण केंद्र सरकारच्या हिंदुस्तान अँटिबायोटिक लि.कडे (एचएएल) असून सन १९९५-९६ साली चालू भांडवली अभावी बंद करण्यात आली होती. यात महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ (सिकॉम) मर्यादित यांची ३३ टक्के भागीदारी असून ५९ टक्के हिस्सेदारी एचएएलची आहे तर ८ टक्के हिस्सेदारी आयडीबीआयची आहे.

केंद्र सरकारने एमएपीएलला पुनर्जीवित करण्यासाठी १०० कोटी रुपये एचएएलच्या माध्यमातून देण्याची तयारी २०१५ मध्ये दर्शवली होती. मात्र प्रत्यक्षात हा निधी देण्यात आला नाही. जागतिक निकषांनुसार औषधे, गोळ्या आणि इंजेक्शन आणि अन्य उत्पादने करण्याची क्षमता या कारखान्यात आहे. एकूण ५० हजार ५८५ चौरस मीटरवर या कारखान्याचे क्षेत्रफळ विस्तारले आहे.

सध्या कोरोनाचे मोठे संकट समोर असल्याने जर चालू भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली तर अल्पावधीतच येथे रुग्णालयासोबत औषध व ऑक्सिजन निर्मिती सुरू करता येणे शक्य असल्याने यावर त्वरित निर्णय घेण्याची विनंती डॉ.राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. एमएपीएलला पुनर्जीवित झाल्याने विदर्भात रोजगार निर्मितीलाही चालना मिळू शकेल, असेही डॉ.राऊत यांनी म्हटले आहे.