नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय; नवाब मलिक यांची माहिती


मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या नागपूर येथील हज हाऊसच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात येत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासाठी नागपूर हज हाऊसचा ताबा तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यासंदर्भात सूचना निर्गमित करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.मलिक म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर विभागातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आरोग्य विभागाच्या दि. ४ मेच्या आकडेवारीनुसार नागपूर शहरात काल २ हजार ६८९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तेथील वाढत्या रुग्णांची उपचाराची सोय होण्याच्या दृष्टीने नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही इमारत ६ मजली असून इमारतीमध्ये ४० खोल्या आहेत. याशिवाय २८ स्वच्छतागृहे व १ भोजनकक्ष आहे. नियमित कालावधीमध्ये येथे सुमारे ७०० लोकांची राहण्याची व्यवस्था केली जाते. इमारतीमधील काही किरकोळ कामे करण्यात येत असून अग्निशमन यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करण्याबाबत नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सुविधांच्या पूर्ततेनंतर जिल्हा प्रशासनामार्फत हे कोविड सेंटर चालविण्यात येईल, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यासाठी प्रयत्न आणि मागणी केली होती. हज हाऊसला भेट देऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. तसेच माजी मंत्री अनिस अहमद यांनीही यासंदर्भात मागणी आणि पाठपुरावा केला होता.