कोरोनामुळे अभिनेत्री श्रीप्रदा यांचे बंगळुरुमध्ये निधन


80 च्या दशकात आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात करणाऱ्या आणि नंतर अनेक मालिकांमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री श्रीप्रदा यांचे आज बंगळुरुमधील एम.एस. रमैया हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या 53 वर्षांच्या होत्या. श्रीप्रदा यांना एमएस रमैया रुग्णालयात श्वासोच्छवासाच्या अडचणीमुळे दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सुमारे दोन आठवडे त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

श्रीप्रदा यांच्या निधनाबद्दल बंगळुरु येथे राहणारे त्यांचे भाऊ रूपेश नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी कोलन कर्करोग माझ्या बहिणीला झाल्याचे निदान झाले आणि तेव्हापासून बंगळुरुतील कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. केमोथेरपी घेण्यासाठी त्यांना दर 15 दिवसांनी रुग्णालयात जावे लागत होते. याच काळात त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात श्रीप्रदा यांनी अजय देवगन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा स्टारर फिल्म ‘भुज- द प्राइड ऑफ इंडिया’चे शूटिंग पूर्ण केले होते.

श्रीप्रदा यांच्यासोबत अभिनेता गजेंद्र चौहान यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर 1992 साली ‘संसार’ आणि काही वर्षांपूर्वी ‘अधुरी हमारी कहानी’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. श्रीप्रदा यांनी 80 आणि 90 च्या दशकात बी ग्रेड चित्रपटांमध्ये जास्त काम केले असून ईशा नायडू असे श्रीप्रदा यांचे खरे नाव होते. गजेंद्र चौहान सांगतात की, त्यांचा पहिला चित्रपट ‘दिलरुबा तांगेवाली’चे निर्माते मोहन टी. गियानी यांनी प्रसिद्ध अभिनेत्री श्री देवी आणि जया प्रदा यांच्या नावावरुन ईशाचे नाव ‘श्रीप्रदा’ ठेवले. त्यानंतर श्रीप्रदा यांचे पडद्यावरील नाव कायमचं राहिले पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या.