मुंबईत दाखल झाला एक लाख कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा


मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुमारे एक लाख लसींचा साठा कोरोना लसीकरण मोहिमेतंर्गत दाखल झाला आहे. महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी लसीचा हा साठा वापरण्यात येणार आहे. मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका कोरोना लसीकरण केंद्रांवर दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत 45 वर्ष तसेच त्यावरील वयोगटाचे पूर्वीप्रमाणे नियमित लसीकरण होणार आहे.

45 वर्ष आणि त्यावरील वयोगटामधील पात्र नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात येईल. पण, यामध्ये पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्यांना कोविन अॅपमध्ये नोंदणी केलेली असणे बंधनकारक आहे. तर दुसरा डोस घेण्यासाठी थेट येणाऱ्या (वॉक इन) नागरिकांनाही लस देण्यात येईल. लसीकरण केंद्रांवर पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही डोससाठी स्वतंत्र रांग असेल. या वयोगटातील पात्र नागरिकांचे लसीकरण करताना 80 टक्के नोंदणीकृत तर 20 टक्के थेट येणाऱ्या नागरिकांना सामावून घेण्याचे नियोजन असल्यामुळे ही विभागणी निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचा विचार करता, सध्या सुरु असलेल्या व्यवस्थेप्रमाणे, मुंबई महापालिकेच्या ठरवून दिलेल्या पाच लसीकरण केंद्रावर प्रत्येकी 500 नागरिकांचे सकाळी 9 ते 5 या नियमित वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’ मध्ये नोंदणी केलेल्या आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेले आहेत, अशा व्यक्तींसाठी असणार आहे.