उद्रेक नकोच; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संभाजीराजे छत्रपतींचे समाजाला आवाहन


कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला. आज सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण देशासह महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावरील सुनावणी पार पडली, त्यावेळी हा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजातून तीव्र नाराजीचा सूर आळवला गेला. पण, सद्य परिस्थिती पाहता न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर करत समाजातील नागरिकांनी उद्रेकाची भाषाही करु नये, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

त्यांनी मराठा आरक्षणाच्या सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना हा निकाल समाजाच्या दृष्टीने दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षण म्हणजे, गरिब मराठ्यांसाठीचाच हा लढा होता. जातीय विषमता कमी होईल, यासाठी हा आमचा प्रयत्न होता. असे असतानाच आता हा कायदा रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वीकारार्ह पण दुर्दैवी असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आजी आणि माजी अशा दोन्ही सरकारनेही समाजाची बाजू जोमाने मांडली. शक्य त्या सर्व परिने बाजू मांडूनही अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला, यासंदर्भात त्यांनी नाराजीचा सूर आळवला. शांतताप्रिय मोर्चे आरक्षणासाठी निघाले, आरक्षणाची किती गरज असल्याचे हे समाजाने जगाला दाखवून दिले. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही बाब नाकारत निर्णय दिला, त्यापुढे आम्ही निशब्द असल्याचे म्हणत सध्या सुरु असणारे कोविडचे संकट पाहता ही वेळ उद्रेकाने पेटून उठण्याची नसल्याचे इशारा त्यांनी दिला.

आरक्षणाच्या बाबतीत या मुद्द्याकडे मी राजकारणाच्या पलिकडे पाहिले, अखेरच्या टप्प्यातही केंद्र, राज्य आणि राज्यातील यापूर्वीच्या सरकारने समाजाची बाजू मांडली, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापुढे कोणालाही जाता येणार नाही. असे असले तरीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज म्हणून समाजासाठी आपल्याला वाईट वाटत असल्याचे म्हणत त्यांनी समाजाला दिलासा दिला.

राज्याला आणि नागरिकांना कोरोना परिस्थितीतून सावरुन तज्ज्ञांनी बसून चर्चा करणे आवश्यक आहे. मराठा समाजासाठी ‘सुपर न्यूमररी’ न्यायाने जागा द्या हाच एकमेव पर्याय असल्याचा मार्ग त्यांनी सुचवला. इतर राज्यांना 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यात आले, मग आपल्या राज्याला का नाही ? हा सवालही त्यांनी उपस्थित करत या महाभयानक परिस्थितीमध्ये सध्या कोरोना रुग्णांवर लक्ष द्या. न्यायालयाच्या निकालाचा मान ठेवा याचा पुनरुच्चार केला.