देशातील पहिल्या ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण मोहिमेला मुंबईतील दादरमध्ये सुरुवात


मुंबई – मुंबईतील दादर येथे कोहिनूर स्क्वेअरच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या कोरोना लसीकरण केंद्राचे उदघाटन होण्यापूर्वीच या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाल्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना या लसीकरण केंद्रावर त्यांच्या कारमध्येच लस देण्यात येणार असल्यामुळे देशातील पहिलेवहिले ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण केंद्र ठरत आहे.

देशात अशा पद्धतीचा पहिलाच प्रयोग सुरु झाला असून, याला मुंबईतील दादर भागात नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकदा लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना रांगेत उभे राहण्यास काही अडचणी येतात. अशा सर्व नागरिकांना लसीकरण मोहिमेदरम्यान अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

सदर सुविधेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना हा उपक्रम उत्तम असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते होणार होते. पण, नागरिकांच्या वाहनांची रिघ पाहता येथे लसी देण्यास सुरुवात करण्यात आली. मुंबईत मागील तील दिवसांपासून लसींच्या तुटवड्यामुळे 45 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. पण, ही मोहिम आता मात्र पुन्हा एकदा एका नव्या रुपाने सुरु झाली आहे. अशीच आणखी दोन- तीन केंद्र सुरु करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

सर्वाच नागरिकांकडे वाहने असतील असे नाही, पण थेट केंद्रावर जाऊन लस घेण्यासोबत वाहनांमधून येणाऱ्या नागरिकांनाही लस देण्याच्या या उपक्रमाचे स्वागत सर्व स्तरांतून करण्यात येत आहे. सुरुवातीला या लसीकरण केंद्रावर नोंदणी कक्ष असून पुढे नागरिकांना ही लस मिळत आहे. आजच्या दिवसभरात येथे 1500 लसी उपलब्ध झाल्या असून, यापुढे ही संख्या नेमकी कोणता आकडा गाठते हे पाहणे महत्त्वाचे असेल.