राज्यातील तीन बड्या पोलीस अधिकाऱ्यांची बदलीसोबत बढती


मुंबई – राज्यातील तीन बड्या पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांसोबत बढती देण्यात आली आहे. या बदल्यामध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई आणि अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती अभियान के वेंकटेशम यांचे नाव आहे. विवेक फणसळकर यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई येथे वर्णी लावण्यात आली आहे.

तर के. वेंकटेशम यांची संचालक, नागरी संरक्षण आणि संदीप बिश्नोई यांची महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) विभाग येथे पदोन्नती झाली आहे. विवेक फणसळकर यांच्या पदोन्नतीमुळे रिक्त होण्याऱ्या ठाणे शहर पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त भार सह पोलीस आयुक्त सुरेश मेखला यांच्यावर पुढील आदेश येईपर्यंत सोपण्यात आला आहे.

३१ मार्च २०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयात विवेक फणसळकर यांनी पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी सुमारे पावणे दोन वर्ष ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला. त्यांनी कोरोना काळात जीवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पुढाकार घेतला होता. कर्तव्य बजावताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना थेट नियुक्ती पत्र देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला होता. त्यांच्या या उपक्रमाचे राज्यभर कौतुक झाले होते.