आयपीएल रद्द झाली तर बीसीसीआयला २ हजार कोटींचे नुकसान

आयपीएल संबधित दोन लोकांना करोना संसर्ग झाल्यामुळे आयपीएल रद्द करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र बीसीसीआयने या लीग मुळे करोना रुग्णांना काही वेळ तरी मनोरंजन होत आहे असे सांगून आत्ता तरी लीग रद्द करण्याची तयारी नसल्याचे संकेत दिले आहेत. मात्र पुढील २४ तास महत्वपूर्ण असून आयपीएल रद्द की सुरु ठेवायची याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

आयपीएल रद्द झाली तर बीसीसीआयला २ हजार कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे. शिवाय या वर्षी भारतात ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या नियोजित टी २० वर्ल्ड कप आयोजनावर सुद्धा प्रश्नचिन्ह लागणार आहे. करोना मुळे आयपीएल रद्द झाली तर टी २० साठी भारताला मिळालेले यजमानपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेही करोडोंचे नुकसान सोसावे लागणार आहे.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने गतवर्षीप्रमाणे या वर्षीही आयपीएल युएई मध्ये यशस्वी करून दाखविण्याचा विचार मांडला होता. पण करोना विस्फोट होऊनही बीसीसीआयने हे सामने भारतातच खेळविण्याचा निर्णय घेतला आणि आता ही स्पर्धा संकटात सापडली आहे. आयपीएल देशात खेळवून आम्ही टी २० वर्ल्ड कप साठी तयार आहोत असा संदेश बीसीसीआय ला द्यायचा होता असे समजते.

टेलीग्रामच्या रिपोर्ट प्रमाणे वर्ल्ड क्रिकेट इकॉनॉमी १५ हजार कोटींची असून त्यातील ५ हजार कोटी म्हणजे ३३ टक्के आयपीएल मधून येतात. यामुळेच बीसीसीआय ला आयपीएल साठी अन्य देशांचे क्रिकेट बोर्ड सहकार्य करत असते. २०१९ मध्ये आयपीएल मधून ४७ हजार कोटींचा महसूल मिळाला होता आणि गेल्या सिझन मध्ये बीसीसीआय ला या लीग मधून चार हजार कोटींचा फायदा मिळाला होता. यंदाही स्पर्धा यशस्वी पार पाडली तर बीसीसीआयला तीन हजार कोटींचा फायदा मिळेल असा अंदाज आहे.