शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरेंसह देशातील १३ नेत्यांनी केली तात्काळ मोफत लसीकरण सुरू करण्याची मागणी


नवी दिल्ली – कोरोनामुळे देशात हाहाकार उडालेला असून त्यामुळे कोरोनाबाधितांची होणारी प्रचंड हेळसांड आणि कोरोनामुळे दिवसागणिक होत असलेले हजारो मृत्यू यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेतली असून, आता केंद्र सरकारकडे तात्काळ मोफत लसीकरण सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी. देवेगौडा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील १३ नेत्यांनी केली आहे.


यासंदर्भात ट्विट करून एक संयुक्त निवेदन राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी प्रसिद्ध केले आहे. कोरोना परिस्थितीसंदर्भात करण्यात आलेल्या मागण्यांचा उल्लेख या निवदेनात करण्यात आला आहे. देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्यामुळे देशातील आरोग्य केंद्र आणि सर्व रुग्णालयांना केंद्र सरकारने विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर लक्ष्य केंद्रीत करावे. त्याचबरोबर संपूर्ण देशात तात्काळ मोफत लसीकरण कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांतील नेत्यांनी केली आहे. ३५,००० कोटींची तरतूद सर्वसाधारण अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. कोरोना लसीकरणासाठी हा निधी वापरण्यात यावा, असेही नेत्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन, बसपा अध्यक्षा मायावती, फारूक अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राजदचे नेते तेजस्वी यादव, डी. राजा, सीपीआय(एम)चे नेते सीताराम येचुरी यांची नावे विरोधी पक्षनेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या या निवेदनावर आहेत.