लस देण्याच्याबाबतीत ‘सीरम’ने महाराष्ट्राला लस देताना झुकते माप द्यावे – राजेश टोपे


मुंबई – महाराष्ट्रातील पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट ही असल्यामुळे लस देण्याच्याबाबतीत अदर पूनावाला यांनी महाराष्ट्राला काहीसे झुकते माप द्यावे, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात दररोज मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत.

तर दुसरीकडे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यालाही केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे सुरूवात झाली आहे. पण, राज्य सरकारकडून हा लसीकरणाचा टप्पा लस तुटवड्यामुळे राबवताना अडथळे येत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री टोपेंनी सीरमचे पूनावाला यांना ही विनंती केल्याचे दिसत आहे.

आमची विनंती अदर पूनावाला यांना आहे की, पुण्यातील ते असल्याने व महाराष्ट्रातच सीरम इन्स्टिट्यूट असल्यामुळे काहीही करून सीरम इन्स्टिट्यूटने झुकते माप हे महाराष्ट्राला दिले पाहिजे, असे एबीपी माझाशी बोलाताना राजेश टोपे म्हणाले आहेत.

तसेच, आम्हाला १८ ते ४४ लसीकरण कुठल्याही पद्धतीने करायचे असेल, यासाठी लागणारी किंमत ही राज्य सरकार लगेच द्यायला तयार आहे. परंतु आपल्याला अधिक जास्त झुकते माप मे व जून महिन्यात द्यायला हवे. जेणेकरून आपल्याला अधिक गतीने लसीकरण करता येईल. आज लस उपलब्ध नसल्याने, आपल्या जवळ निधी आहे आपण खर्च करायला तयार आहोत, विकत घ्यायला तयार आहोत पण लस उपलब्ध नसल्यामुळे आज आपल्याला १८ ते ४४ वयोगाटातील लसीकरण कमी गतीने करावे लागत असल्याचेही यावेळी राजेश टोपेंनी सांगितले.