क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा भारताला कोविड साठी मदतीचा हात

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डने भारताला कोविड १९ परिस्थितीत सहकार्याचा हात देण्याचा निर्णय घेतला असून क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन, युनिसेफ ऑस्ट्रेलिया यांच्या सहकार्याने पैसे जमवून दिले जाणार आहेत. प्रारंभिक स्वरुपात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ५० हजार डॉलर्स म्हणजे ३७ लाख रुपये दान म्हणून दिले असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॅकले यांनी सांगितले.

ते म्हणाले ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचे एक खास नाते आहे. त्यात दोन्ही देशातील क्रिकेट प्रेम अंतर्भूत आहे. भारतात कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेने कहार माजविला असून आमच्या भारतीय बंधू भगिनीना त्यामुळे त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पेंट कमिन्स आणि ब्रेट ली यांनी अगोदरच मदतीचा हात देऊन दान दिले आहे. त्याच भावनेने आम्ही युनिसेफ ऑस्ट्रेलियासह फंड गोळा करत आहोत आणि ते पैसे भारताला कोविड १९ विरोधातील लढाई साठी दिले जातील. यातून ऑक्सिजन संयंत्रे, चाचणी किट्स, औषधे, लस खरेदीसाठी मदत होऊ शकेल.