करोना सेंटर मधून फरारी झालेल्या चोरट्याच्या पत्नीनेच पोलिसांना केला फोन

मुंबईच्या बांद्रा ते बोरिवली या भागात अनेक औषधी दुकानातून चोरी करणाऱ्या एका चोरट्याला त्याच्या पत्नीनेच करोनाच्या भीतीने पोलिसांच्या हवाली केल्याचा प्रकार कांदिवली पोलीस हद्दीत घडला. झाले असे की करीम साबुला खान याला डझनावारी औषध दुकानात चोरी केल्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अटक केली होती पण तपासणीत तो करोना संक्रमित असल्याचे दिसून आल्यावर त्याला कांदिवलीच्या साईनगर क्वारंटाइन सेंटर मध्ये भरती केले गेले होते.

येथून करीमने खिडकीची जाळी उचकटून पोबारा केला होता. तेव्हा कांदिवली पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंके यांनी त्याच्या पत्नीशी संपर्क साधला आणि त्याला कोविड झाला आहे, तो घरी आला तर ताबडतोब फोन करा, अन्यथा तुम्हाला सुद्धा करोनाची लागण होईल असे सांगितले. पोलिसांच्या अंदाजानुसार करीम खरोखरच घरी आला तेव्हा त्याच्या बायकोने ताबडतोब पोलिसना फोन करून करीम घरी असल्याची माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी तातडीने त्याला पकडून पुन्हा अटक केली आणि पीपीई किट घालून त्याची रवानगी पुन्हा एकदा क्वारंटाइन सेंटरवर केली असे समजते.