या देशांमध्ये आहेत सोन्याचे अवाढव्य साठे


सोनेखरेदीचे महत्व हा प्रत्येक भारतीय स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. किंबहुना जगातील अकरा टक्के सोन्याचा साठा हा भारतीय गृहिणींकडे असल्याचे म्हटले जाते ! समस्त जगामध्ये भारतीय लोक सर्वाधिक सोने खरेदी करणारे समजले जातात. पण केवळ लोक किती सोने खरेदी करतात यावर नाही, तर त्या त्या देशांच्या रिझर्व्ह बँकांमध्ये सोन्याचा सरकारी अधिकृत साठा किती मोठा आहे, यावर त्या देशाची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे, हे अवलंबून असते. पण भारतामध्ये मात्र रिझर्व्ह बँकेमध्ये नसेल इतके सोने भारताच्या जनतेकडे असल्याचे म्हटले जाते !

सोन्याचा सर्वधिक साठा असणाऱ्या देशांमध्ये अमेरिका प्रथम स्थानी आहे. जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा या देशाच्या संग्रही आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अनुसार अमेरिकेच्या संग्रही ८,१३३ टन सोने आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या देशांमध्ये जर्मनी दुसऱ्या स्थानावर आहे. या देशाच्या संग्रही ३,३८१ टन सोने आहे. समस्त युरोपीय देशांमध्ये सर्वाधिक सोन्याचा साठा असणारा जर्मनी हा देश आहे. सोन्याचा सर्वाधिक साठा असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये इटली या देशाचा समवेश असून या देशाच्या संग्रही २,४५२ टन सोने आहे. जगातील चौशष्ट टक्के सोने इटली देशाकडे आहे. त्यानंतर यादीमध्ये फ्रांसचा समावेश असून, या देशाकडे २,४३६ टन सोने आहे.

भारताचा शेजारी देश चीन हा या यादीमध्ये पाचव्या स्थानावर असून, या देशाच्या संग्रही १,७६२ टन सोने आहे, तर चीनच्या पाठोपाठ रशिया हा देश या यादीमध्ये सहाव्या स्थानावर आहे. या देशाच्या संग्रही १३९३ टन सोने आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला स्वित्झर्लंड जगातील सर्वाधिक सोन्याचे साठे असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये सातव्या स्थानावर असून, या देशाच्या संग्रही १०४० टन सोने आहे, तर जपान या यादीमध्ये आठव्या क्रमांकारावर असून, जपानच्या संग्रही ७६५ टन सोने आहे. जपानच्या बाबतीत विशेष गोष्ट अशी, की १९६० सालापर्यंत या देशाच्या संग्रही केवळ सहा टन सोने होते. जपानच्या पाठोपाठ नेदरलँड्स हा देश या यादीमध्ये नवव्या स्थानावर असून, या देशाच्या संग्रही ६१२ टन सोने आहे, तर या यादीमध्ये भारताचा क्रमांक दहावा आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अनुसार भारताच्या संग्रही ५५७.७ टन सोने आहे. वास्तविक भारतातील देवस्थाने आणि नागरिकांचे खासगी सोन्याचे साठे लक्षात घेता भारतामध्ये ५५७.७ टनांहून किती तरी जास्त सोन्याचा साठा असल्याचेही कौन्सिल म्हणते.

Leave a Comment