घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कशाप्रकारे लावावी ‘नेमप्लेट’?

name-plate
वास्तूशास्त्र, आपल्या घराची रचना कशी असावी याबद्दल मार्गदर्शन करतेच, पण त्याशिवाय घरामध्ये लहानमोठ्या वस्तू कशाप्रकारे आणि कुठे ठेवल्या जाव्यात याबद्दलचे ही काही निश्चित नियम वास्तूशास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत. प्रत्येकाच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी हमखास आढळणारी वस्तू म्हणजे त्या घरामध्ये जे कुटुंब राहत असेल त्या कुटुंबाच्या नावाची पाटी, म्हणजेच ‘नेमप्लेट’. ही नेमप्लेट कशा प्रकारे लावली जावी याबद्दल वास्तूशास्त्रामध्ये काही सूचना केल्या गेल्या आहेत.
name-plate1
सुवाच्य अक्षरामधील आकर्षक नेमप्लेट मुख्य प्रवेशद्वाराची शोभा वाढवितेच, त्याचबरोबर योग्य पद्धतीने लावली गेलेली नेमप्लेट घरामध्ये सकारात्मक उर्जाही आकर्षित करत असते. नेमप्लेट घराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असावी. जर डाव्या बाजूला लावणे शक्य नसेल, किंवा तेवढी जागा उपलब्ध नसेल, तरच मग जिथे पुरेशी जागा असेल, तिथे लावावी. तसेच दरवाज्याच्या एकूण उंचीच्या अर्ध्या उंचीच्या किंचित वर नेमप्लेट लावली जावी.
name-plate2
नेमप्लेट नेहमी आयताकृती, वर्तुळाकार किंवा चौकोनी असावी. तसेच नेमप्लेट लावताना ती सतत हलत राहणार नाही अशा बेताने, पक्की लावली जावी. नेमप्लेटच्या समोरच्या बाजूला ‘वेधदोष’ नसावा, म्हणजेच नेमप्लेट सहज दिसू शकणार नाही असा एखादा खांब किंवा झाड, किंवा तत्सम काही नेमप्लेटच्या समोर येऊ नये अशा बेताने नेमप्लेट लावली जावी. त्याचप्रमाणे नेमप्लेट मोडलेली असल्यास, त्यावरील अक्षरे पुसट झाली असल्यास किंवा नेमप्लेटवर चिरा पडल्या असल्यास ही नेमप्लेट त्वरित बदलवून घेऊन नवी नेमप्लेट लावावी.
name-plate3
नेमप्लेट सुटसुटीत असावी, म्हणजेच त्यावर खूप काही लिहिलेले नसावे. त्याचबरोबर नेमप्लेटवर प्राणी, पक्षी, इत्यादींची चित्रे असणे अशुभ मानले गेले आहे. तसेच नेमप्लेटवर ठिकठीकाणी भोकेही असू नयेत.

Leave a Comment