आठवड्यातून किती वेळा केस धुणे योग्य आहे?


जेव्हा प्रश्न केसांची निगा राखण्याचा असतो, तेव्हा आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत या गोष्टीचा विचार करणे अगत्याचे ठरते. काहींच्या म्हणण्यानुसार आठवड्यातून दोन वेळा केस धुवावेत, तर काहींच्या मते आठवड्यातून किमान चार वेळा केस धुवायलाच हवेत. केस धुण्यासाठी वारंवार शँपू वापरल्याने केस खराब होतात असे ही काहींचे म्हणणे असते. त्यामुळे आठवड्यातून केस नक्की किती वेळा धुवावेत यावर फारसे कोणाचे एकमत झालेले दिसत नाही. पण या बाबतीत काही गोष्टी लक्षात घेता येतील.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे केस वेगळे असतात. तुमच्या शरीरातील जीन्स वर तुमच्या केसांचा प्रकार अवलंबून असतो. तुमच्या केसांचे टेक्श्चर, रंग, केस दाट किंवा पातळ असणे हे सर्व मोठ्या प्रमाणावर अनुवंशिकतेवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाच्या केसांसाठी एकसारखी निगा राखण्याची पद्धत साजेशी असेल असे नाही. तसेच प्रत्येकाच्या केसांसाठी एकाच तऱ्हेची प्रोडक्ट्स सूट होतील असे नाही. त्यामुळे तुमच्या केसांसाठी योग्य प्रोडक्ट्स सापडेपर्यंत निरनिराळी प्रोडक्ट्स वापरत राहणे चांगले. त्याचबरोबर आठवड्यातून किती वेळा केस धुतले जावेत या बाबतीत देखील तुमचे केस कशा प्रकारचे आहे हे बघून निर्णय घ्यावा. मात्र केसांसाठी एखादे प्रोडक्ट निवडताना कमीत कमी तीन आठवडे हे प्रोडक्ट वापरून त्यानंतरच ते तुमच्या केसांसाठी योग्य आहे किंवा नाही हे ठरवावे.

आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत हे तुमच्या जीवनशैलीवरही अवलंबून असते. ज्या व्यक्ती सतत घरातच राहतात, ज्यांना बाहेर पडण्याची गरज पडत नाही, ज्यांना फारसे काम न करावे न लागल्याने फारसा घाम देखील येत नाही अश्या व्यक्तींनी आठवड्यातून तीन वेळा केस धुतले तरी त्यांच्यासाठी ते पुरेसे ठरते. पण ज्या व्यक्तींना सतत बाहेर हिंडावे लागते, ज्याच्या केसांवर सतत ऊन, धुळीचा मारा होत असतो, किंवा ज्यांना सतत काम केल्याने घाम येत राहतो, त्या व्यक्तींना जवळजवळ रोजच केस धुण्याची गरज वाटू शकते.

शँपू आणि कंडीशनर मध्ये सल्फेट असते. त्यामुळे यांच्या अतिवापराने केसांमधील नैसर्गिक तेले निघून जाऊन केस रुक्ष, कोरडे बनू लागतात. त्यामुळे आठवड्यातून जास्त केस धुण्याची आवश्यकता असली, तरी केसांना तेलाची मालीश करून पोषण मिळेल याची काळजी घ्यावी.

Leave a Comment