असे आहेत चिकूचे फायदे


अतिशय मधुर चवीचे आणि सहज उपलब्ध असणारे असे फळ म्हणजे चिकू. हे फळ शरीराला ताकद देणारे, शरीरातील लोहाची कमतरता दूर करणारे, हाडांना बळकटी देणारे, शरीराची चयापचय शक्ती वाढविणारे, असे बहुगुणी आहे. चिकूच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांवर आहारतज्ञ आणि वैज्ञानिकांनी संशोधन केले असून, त्याद्वारे चिकूचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे निदान केले आहे. मूळचे मेक्सिको आणि मध्य अमरिकेतील काही भागांमध्ये होणारे हे फळ आता जगभरातील अनेक देशांमध्ये पिकविले जात असते. चिकूचे झाड जास्तीत जास्त तीस मीटर उंचीपर्यंत वाढू शकत असून, सर्वसाधारणपणे या झाडाची उंची दहा ते पंधरा मीटर पर्यंत वाढते. उत्तम देखभाल लाभलेले चिकूचे झाड एका वर्षामध्ये दोन हजार फळे देऊ शकते.

चिकू हे फळ अवीट गोडीचे असून, भारत, मध्य अमेरिका, दक्षिण मेक्सिको, कॅरीबियन, वेस्ट इंडीज या भागांमध्ये प्रामुख्याने पाहिले जात असून, या ठिकाणी या फळाला ‘सॅपोटा’ या नावाने ओळखले जाते. काहीसा अंडाकृती असा या फळाचा आकार असून, याचा रंग पिवळसर भुरा असतो. उत्तम प्रतीचा चिकू वजनाला साधारण दीडशे ग्राम पर्यंत भरतो. चिकूला गोड चव देणारे सुक्रोज आणि ग्लुकोज शरीराला त्वरित उर्जा देणारे आहेत. तसेच या फळामध्ये असणाऱ्या पोषक तत्वांमुळे याच्या सेवनाने त्वचा नितळ, चमकदार होते.

चिकूमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे असतात. यामध्ये ग्लुकोज, क्षार, जीवनसत्वे, लोह, तांबे, असते. ही सर्व पोषक तत्वे शरीराचे एकंदर आरोग्य चांगले ठेवण्यास सहायक आहेत. चिकूमध्ये क, ब, इ, जीवनसत्वे मुबलक प्रमाणात आहेत. तसेच या फळामध्ये प्रथिनेही असल्याने हे फळ सर्वच पोषक तत्वांनी परिपूर्ण म्हणता येईल. चिकूमध्ये असलेले क्षार आणि जीवनसत्वे ‘स्ट्रेस’ कमी करणारी असल्याने ज्यांना मानसिक तणावामुळे निद्रानाश जडला असेल, अश्यांसाठी चिकूचे सेवन उत्तम असते. या फळामध्ये सर्वच पोषक तत्वे असल्याने गर्भवती महिलांच्या आहारामध्येही हे फळ अवश्य समाविष्ट केले जावे. एखाद्या वेळी जर अचानक चक्कर येऊ लागली, किंवा मळमळू लागले, तर चिकू खाण्याने या समस्या नाहीशा होतात.

चिकूमध्ये फायबर असल्याने बद्धकोष्ठ दूर करण्यासही याचे सेवन सहायक आहे. तसेच चिकू रेचक असल्याने या फळाच्या सेवनाने पोट साफ होण्यास मदत होते. अपचन आणि जुलाब यांमध्येही चिकूचे सेवन उत्तम मानले गेले आहे. चिकूमध्ये अ जीवनसत्व मुबलक मात्रेमध्ये असल्याने हे फळ दृष्टीसाठी उत्तम आहे. व्यक्ती वयस्क होऊ लागली, की दृष्टीदोष उत्पन्न होण्यास सुरुवात होते. अशा वेळी हे दोष बळावू नयेत यासाठी चिकूचे सेवन सहायक ठरते. चिकूमध्ये मँगनीज, झिंक, आणि कॅल्शियम मुबलक मात्रेमध्ये असल्याने याच्या सेवनाने हाडे मजबूत राहतात. तसेच यामध्ये लोह असल्याने याच्या सेवनाने शरीरातील लोहाची कमतरता किंवा अनिमिया सारखे विकार दूर होण्यास मदत मिळते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment