महाराष्ट्र दिनी शिवभोजन थाळीने ओलांडला ४ कोटींचा टप्पा – छगन भुजबळ


मुंबई : राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यात 26 जानेवारी 2020 ते 1 मे 2021 या कालावधीत तब्बल 4 कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शिवभोजन ही महत्त्वाकांक्षी योजना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली. राज्यात 26 जानेवारी 2020 ला या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार केवळ 10 रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. पुढे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ 5 रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा निर्णय मार्च 2020 मध्ये घेण्यात आला होता. हा सवलतीचा दर मार्च 2021 पर्यंत लागू करण्यात आलेला होता.

मात्र, अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने आणि पुन्हा आपण राज्यात कडक निर्बंध लागू केल्यामुळे ही थाळी आता आपण मोफत देत आहे. तसेच राज्य शासनाने यापूर्वीच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत सुरु असलेल्या शिवभोजन केंद्रांच्या प्रतिदिन इष्टांकामध्ये दिडपट वाढ केली आहे. यात जे शिवभोजन केंद्र दिवसाला 100 थाळ्या वितरित करत होते आता ते केंद्र 150 थाळ्या वितरित करीत आहे.

राज्यातील कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे.

तसेच शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी 11 ते 3 या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरी भागासाठी प्रति थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी 30 रुपये शासन अनुदान देत आहे. तसेच राज्यात सुरू असलेल्या शिवभोजन थाळीच्या उद्दिष्टामध्ये वाढ करून अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा मानसदेखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी असलेल्या या शिवभोजन थाळी योजनेला मिळणारा वाढता प्रतिसाद राज्य शासनास प्रेरणादायी आहे, तसेच राज्यातील गरीब, मजूर आणि कामगार वर्गाला या योजनेचा फायदा होत असल्यामुळे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.