या कालीमातेला आहेत नूडल्स प्रिय


कोलकाता शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांमधून भ्रमंती करीत असताना येथील संस्कृती, खाद्यपरंपरा अगदी सहजच सामोरी येते. अनेक भव्य मंदिरांनी हे शहर नटलेले आहे. यामध्ये एक आगळेवेगळे मंदिर आहे ‘चायनीज काली माता’ मंदिर. हे मंदिर कालीमातेला समर्पित असून, मंदिराचा बाहेरील भाग इतर मंदिरांप्रमाणेच दिसतो. मात्र या मंदिरामध्ये देवीला दाखविला जाणारा नैवेद्य, ही या मंदिराची खासियत आहे. बहुतेक मंदिरांमध्ये मिष्टान्ने नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची प्रथा असतानाच या मंदिरामध्ये मात्र कालीमातेला नैवेद्यामध्ये चक्क नूडल्स, फ्राईड राईस आणि अमेरिकन चॉपस्युई हे पदार्थ अर्पण केले जातात.

कोलकाता शहराच्या तांगडा भागातील चायना टाऊन या भागामध्ये हे मंदिर आहे. नावाप्रमाणेच या भागामध्ये बहुतेक वस्ती चीनी लोकांची आहे. ‘तांगडा चायना टाऊन’ हा परिसर कोलकाताच्या सायन्स सिटीपासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर आहे. या मंदिराचा इतिहास मोठा रोचक आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वी या ठिकाणी केवळ कुंकू फासलेले दोन काळे पाषाण होते. या ठिकाणी कालीमातेचा वास आहे अशी मान्यता असून त्या काळी पुष्कळ भाविक या पाषाणांची मनोभावे पूजा करीत. कालीमाता केलेल्या नवसाला पावते अशीही भाविकांची श्रद्धा होती. या ठिकाणाचे महात्म्य ऐकून एके दिवशी एक चीनी कुटुंब या ठिकाणी आले. त्या परिवारातील दहा वर्षांचा एकुलता एक मुलगा भयंकर आजारी असून, त्याच्या जगण्याची कोणतीच आशा शिल्लक राहिली नसल्याने आपल्या मुलासाठी देवीकडे जीवनदान मागण्याच्या इच्छेने हे कुटुंब येथे आले होते. या ठिकाणी राहून त्यांनी अनेक दिवस देवीची मनोभावे भक्ती केली आणि चमत्कार असा, की त्यांचा मुलगा भयंकर आजारातून पूर्णपणे बरा झाला. तेव्हापासून या देवस्थानाला चीनी लोकांमध्ये मोठे महत्व प्राप्त झाले. म्हणूनच या मंदिरातील देवीला प्रसाद म्हणून चायनीज पदार्थ अर्पण केले जातात.

या मंदिरामध्ये दररोज सकाळी-संध्याकाळी हिंदू पंडित पूजेसाठी येत असून, या मंदिराच्या कारभाराची व्यवस्था मात्र इसोन चेन नामक चीनी माणसाकडे आहे. कालीपूजेच्या काळामध्ये या मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जात असून, हिंदू आणि चीनी भाविक या उत्सवामध्ये मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात.

Leave a Comment