‘ऑक्सिजन’च्या परिपूर्णतेसाठी प्रयत्नशील राहा; अब्दुल सत्तार यांचे निर्देश


धुळे : धुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत असले, तरी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे. आगामी काळात कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या बाबतीत परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश महसूल राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात ‘कोविड- 19’ संसर्गाच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री सत्तार म्हणाले, कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर आतापासूनच नियोजनाला सुरवात करावी. कोविड केअर हॉस्पिटल, रुग्णालयांची नियमितपणे तपासणी करीत अग्नि सुरक्षा उपकरणे, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेची घटनास्थळी जावून तपासणी करावी. महानगरपालिकेकडे उपलब्ध रेमडेसिवीर इंजेक्शन सर्वांना उपलब्ध करून द्यावीत. तसेच या इंजेक्शनचा काळजीपूर्वक वापर करावा, असेही त्यांनी आवाहन केले.

जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले, की धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत 33 हजार 847 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 33 हजार 667 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या तीन हजार 595 रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर मागील आठवड्यात 1.52 टक्के होता. रुग्णांच्या तुलनेत खाटांची संख्या अधिक आहे. ऑक्सिजन नियमितपणे पुरवठा होत आहे. रेमडेसिव्हर इंजेक्शनचा नियमितपणे पुरवठा होत असून समितीच्या माध्यमातून वितरण केले जात आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची चाचणी करण्यात येत आहे.

‘कोविड 19’वरील उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्हा वार्षिक योजना व आमदार निधीतून जिल्ह्यात 12 ठिकाणी, तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. 18 ते 45 वर्षे वयोगटातील लसीकरणाला पाच केंद्रांवर सुरवात होत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘कोरोना’चे नोडल अधिकारी डॉ. पाटील यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना विषयीची सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष रंधे, आमदार श्रीमती गावित यांनी विविध सूचना केल्या.