‘टाटा मोटर्स’ माणगाव आयटीआयच्या बळकटीकरणासाठी इच्छुक ही अभिमानास्पद बाब – आदिती तटकरे


मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), माणगाव येथे सामाजिक उत्तरदायित्वातून (सीएसआर) अत्याधुनिक सुविधांमधून विद्यार्थ्यांना सखोल प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यास टाटा मोटर्स या आघाडीच्या कंपनीने पुढे येणे, ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी येथे केले.

आयटीआय माणगाव येथे ऑटोमोबाईल ट्रेड सुरू करण्याबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीदरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी कौशल्य विकास व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक अनिल जाधव, माणगाव उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रशाली दिघावकर, पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, माणगाव तहसिलदार प्रियांका कांबळे, माणगाव आयटीआयचे प्राचार्य चंद्रकांत पडलवार, टाटा मोटर्स प्रा.लि.चे प्रतिनिधी विनोद कुलकर्णी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी टाटा मोटर्सच्या प्रतिनिधींनी एक सादरीकरण केले. ज्यामध्ये ५ हजार चौ.फु.जागेच्या आवारात दिल्ली आयटीआय येथे ऑटोमोबाईल ट्रेड अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत त्यांनी माहिती दिली. ड्रायव्हिंगसह गाड्यांचे सखोल प्रशिक्षण, क्लासरूम लेक्चर्स, ऑटोमोबाईल मॅकेनिक ट्रेड ज्यामध्ये वाहनाचे सर्व सुट्टे भाग हाताळणे व दुरुस्ती अशा रितीने दर्जेदार अभ्यासक्रमातून कुशल विद्यार्थी तयार होण्यास मदत होते, असे यावेळी सांगण्यात आले.

आयटीआय माणगाव येथे अशा प्रकारचे दर्जेदार प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आवश्यक जागेची पाहणी व सर्वेक्षण अहवाल तात्काळ तयार करावा, असे निर्देश राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधितांना दिले.

ऑटोमोबाईल ट्रेड क्षेत्राचे अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक व आवश्यक त्या सुविधा टाटा मोटर्सच्या सहभागातून आयटीआयला देण्यास तयार आहे. त्यांना योग्य ते सहकार्य केले जाईल, असे कौशल्य विकास व प्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी यावेळी सांगितले.