आनंदवार्ता! रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप अखेर भारतात दाखल


नवी दिल्ली – कोरोनाबाधितांची देशात संख्या वाढत असताना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद विमानतळावर रशियातून स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप पोहोचली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. आजपासून देशात १८ वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. पण लसींचा तुटवडा काही ठिकाणी जाणवत असल्यामुळे अडथळे येत आहे. अशातच स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप भारतात दाखल झाल्यामुळे येत्या काळात लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस सध्या भारतात वापरली जात आहे. स्पुटनिक व्हीसोबत भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध झाली आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. स्पुटनिक व्ही लसीची परिमामकारकता ९२ टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. या चर्चेनंतर पंतप्रधानांनी ट्विटरवरून पुतिन यांचे आभार मानले होते. तसेच, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांविषयी मंत्री स्तरावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.