असा आहे प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येचा इतिहास


अयोध्या आणि प्रतिष्ठानपूर (झुंसी) यांच्या इतिहासाचा संबंध ब्रह्मदेवांचे मानसपुत्र मनु यांच्याशी निगडित आहे. प्रतिष्ठानपूर आणि तेथील चांद्रवंशी शासक मनु-पुत्र ऐल (इला) पासून जन्माला आले आहेत, त्याचप्रमाणे अयोध्येचे सूर्यवंशी राजे मनु-पुत्र इक्ष्वाकूचे वंशज आहेत. बेंटली, पार्टीजर इत्यादी विदेशी इतिहासकारांनी ‘ग्रहमंजरी’ नामक ग्रंथाचा अभ्यास करून अयोध्येच्या स्थापनेचा काळ ख्रिस्तपूर्व २२०० वर्षांच्या आसपासचा असल्याचे म्हटले आहे. या वंशाचे राजे आणि रामचंद्रांचे पिता दशरथ हे या वंशाचे ६३वे राजे असल्याचे समजते.

जेव्हाही भारतातील प्राचीन धर्मक्षेत्रांचा उल्लेख केला जातो, तेव्हा त्यांमध्ये अयोध्येचा उल्लेख आवर्जून केला जातो, असे अयोध्येचे भारतीय संस्कृतीतील महत्व आहे. किंबहुना अयोध्या, मथुरा, काशी, माया, कांची, अवंतिका, पुरी आणि द्वारावती या सात नगरींचे दर्शन मोक्षदायी असल्याचे वेदांमध्ये म्हटले गेले आहे. अयोध्या क्षेत्र केवळ हिंदूधर्मियांसाठी नाही, तर इतर धर्मांसाठीही महत्वाचे केंद्र होते. जैन परंपरेतील २४ तीर्थंकारांमध्ये २२ तीर्थंकर इक्ष्वाकू वंशाचे होते. यातील चार तीर्थंकरांचे जन्मस्थान अयोध्या असून, बौद्ध मान्यतांच्या अनुसार बुद्ध देवांनी देखील अयोध्येमध्ये सोळा वर्षे निवास केला असल्याचे म्हटले जाते. मध्यकालीन भारतातील प्रसिद्ध संत रामानंद यांचा जन्म जरी प्रयागमध्ये झाला असला, तरी रामानंदी संप्रदायाचे प्रमुख केंद्र अयोध्याच होते. कौशल, कपिलवस्तू, वैशाली, आणि मिथिला सारख्या तत्कालीन उत्तर भारतातील प्रमुख प्रांतांवर इक्ष्वाकू वंशीयांचे अधिपत्य असून, मनुद्वारे स्थापित अयोध्येबद्दल बोलायचे झाल्यास वाल्मिकी कृत रामायणातील बालकांडामध्ये केलेल्या उल्लेखानुसार अयोध्या बारा योजने लांब आणि तीन योजने रुंद क्षेत्रात वसलेली होती.

सातव्या शतकामध्ये चीनी यात्री ह्युआंग सांगने आपल्या प्रवासवर्णनामध्ये अयोध्येचा उल्लेख ‘पिकोसिया’ या नावाने केलेला आहे. त्यामध्ये या नगरीचे क्षेत्र दोन मैलांच्या आसपास विस्तारलेले असल्याचे म्हटले आहे, तर ‘ऐन-ऐ-अकबरी’मध्ये अयोध्येचा विस्तार, १४८ कोस लांबी आणि ३२ कोस रुंदी असलेल्या क्षेत्रामध्ये असल्याचे म्हटले आहे. सृष्टीच्या प्रारंभातील त्रेतायुगातील रामचंद्रापासून द्वापरकालीन महाभारत आणि त्यांनतरही पुष्कळ शतके नंतर पर्यंतच्या अनेक ग्रंथांमध्ये अयोध्येचा आणि इक्ष्वाकूच्या शासक वंशियांचा उल्लेख सापडतो. रामाचा पुत्र लव याने येथेच श्रावस्ती वसविल्यानंतर या क्षेत्राचा स्वतंत्र उल्लेखही पुष्कळशा ग्रंथांमध्ये सापडतो. या नगरावर मगधच्या मौर्य शासकांचे व गुप्त वंशीय आणि कन्नौजच्या शासकांचे अधिपत्य राहिले. अखेर महमूद गझनीचा भाचा सैय्यद सालारने या क्षेत्रामध्ये तुर्की शासन आणले. त्यानंतर हे क्षेत्र तैमुर, मेहमूद शाह यांच्या अधिपत्याखाली १४४० पर्यंत राहिले.

१५२६ साली बाबराने मुघल राज्याची स्थापना केल्यांनतर १५२८ साली त्याच्या सेनापतीने अयोध्या काबीज केले आणि त्यानंतर येथे मशिदीची निर्मिती झाली. अकबराच्या शासनाच्या काळी प्रशासनिक अधिकाऱ्यांना नव्याने जबाबदाऱ्या दिल्या गेल्यानंतर हे क्षेत्र स्थिरस्थावर झाले. त्यानंतर या क्षेत्राचे व्यावसयिक आणि भू-राजनैतिक महत्व पुष्कळ वाढले. गंगेचा उत्तरी भाग आणि दिल्ली, आग्रा ही महत्वाची ठिकाणे सुदूर पूर्वेला जोडणारा मार्ग अयोध्येच्या नजीक असल्याने १५८० साली अकबराने अवध संस्थानाचे निर्माण केले आणि अयोध्या या संस्थानाची राजधानी म्हणून घोषित केली गेली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अनेक क्षेत्रीय स्वतंत्र राज्ये निर्माण होऊ लागली होती. त्याचवेळी अवधही स्वतंत्र राज्य बनले आणि १७३१ साली या राज्याचे
धागेदोरे मुहम्मद शाहने आपले वजीर सआदत खान ह्यांच्या हाती दिले. त्यांच्यानंतर त्यांचे जावई मन्सूर अली यांच्या हाती अवधची धुरा आली. मन्सूर अली यांचे पुत्र शुजा उद्दौलाह याने अयोध्येपासून तीन मैल अंतरावर फैझाबाद वसविले, आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र आसफ उद्दौलाहने त्यानंतर लखनऊ शहर वसविले. त्यानंतर अयोध्या, लखनऊ आणि फैझाबाद अनेक अवधच्या नवाबांच्या राजधानी म्हणून नावारूपाला आल्या.

Leave a Comment