करोना काळात राहण्यासाठी सिंगापूर सर्वात सुरक्षित देश

करोनाच्या संकट काळात सिंगापूर हा राहण्यासाठी सर्वात सुरक्षित देश ठरला आहे. ब्लूमबर्गच्या कोविड रेझीलन्स रँकिंग रिपोर्ट मध्ये ही माहिती दिली गेली आहे. गेल्या नोव्हेंबर मध्ये ब्लूमबर्गने कोविड रेझीलन्स रँकिंग सुरु केले असून त्यानुसार करोना काळात कोणता देश किती सुरक्षित या आधारावर क्रमांक दिले जात आहेत.

या यादीत सिंगापूर प्रथम क्रमांकावर असून दोन नंबर वर न्यूझीलंड आणि तीन नंबरवर ऑस्ट्रेलिया आहे. या देशांनी करोनावर वेगाने नियंत्रण मिळविले असून लसीकरण कार्यक्रमाचा वेग चांगला राखला आहे. सिंगापूर सरकारने स्थानिक पातळीवर करोना संक्रमणावर चांगलेच नियंत्रण आणले आहे. या देशात आता कोविड संक्रमण जवळ जवळ नाही अशी परिस्थिती आहे. १/५ लोकसंखेचे लसीकरण येथे पूर्ण झाले आहे.

सिंगापूर, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथील सरकारांनी करोना वर नियंत्रण मिळवून नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ब्लूमबर्गच्या या यादीत ५३ देशांचा समावेश असून भारताचा नंबर ३० आहे. सर्वात खराब कामगिरी पोलंड, ब्राझील आणि अर्जेंटिना देशांच्या नावावर नोंदली गेली आहे.