उद्यापासून सुरु होऊ शकेल राज्यातील लसीकरण, पण…


मुंबई – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोनच दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस अपुरे असल्यामुळे आणि नव्या डोसचा पुरवठा देखील पुरेसा नसल्यामुळे उद्यापासून राज्यात १८ ते ४४ वयोगटामध्ये लसीकरण सुरू करता येणार नाही, असे जाहीर केले आहे. पण, राजेश टोपे यांनी आज बोलताना १ मे पासून म्हणजेच शनिवारपासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील सूतोवाच केले आहेत.

१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल. पण नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळाली आहे, त्यांनीच संबंधित केंद्रावर जायला हवे. सुरुवातीला जिल्ह्यात एखादे केंद्र असू शकेल. त्यामुळे ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच केंद्रावर जावे. लस अतिशय नाममात्र स्वरूपात उपलब्ध असल्याचे राजेश टोपेंनी नमूद केले.

सीरमला आम्ही पत्र लिहिले होते. त्यांनी सांगितले मे महिन्यात १३ ते १४ लाख लसीचे डोस देऊ. भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचे ४ ते साडेचार लाख डोस देऊ शकेल. दोघांची बेरीज १८ लाखांपर्यंत जाईल. त्यादृष्टीने १८ ते ४४ वयोगटासाठी कमी केंद्रांवर लसीकरण सुरू करू शकलो, तर ते करता येऊ शकेल. पण एक नक्की आहे की केंद्राने खूप कमी ठेवले, तर जास्त कालावधीसाठी लसीकरण सुरू राहील, असेही राजेश टोपे यावेळी म्हणाले.

दरम्यान, कोरोना लसीचा पुरवठा अपुरा असताना दुसरा डोस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना डोस मिळेल का? याची चिंता वाटू लागली होती. पण, राजेश टोपे यांनी याविषयी देखील माहिती दिली आहे. ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांना दुसरा डोस द्यावाच लागेल. तो पूर्ण करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच, लस उत्पादक कंपन्यांना ५० टक्के उत्पादन केंद्र सरकारला देणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि उरलेला ५० टक्के राज्य सरकारे आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे. या दोघांकडेही खूप मागणी आली, तर कुणाला प्राधान्य देणार? याविषयी सरकारला नियंत्रण आणावे लागेल का? असाही प्रश्न निर्माण होतो, असे देखील त्यांनी नमूद केले.

लसीकरणाचा कार्यक्रम भारत सरकारच्या नियमावलीने चालणार आहे. आम्ही ४ हजार २०० लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. त्यानुसार लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकारचे म्हणणे असेल की खासगी केंद्रांवर आणि रुग्णालयांत लसीकरण करू नये, तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल, असे देखील राजेश टोपे म्हणाले.

लसींचा पुरवठा राज्यात व्यवस्थित झाल्यास पूर्ण क्षमतेने म्हणजेच ८ लाख लोकांना दिवसाला लसीकरण देणे शक्य होईल, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले. आम्ही दिवसाला जर साडेपाच लाख लोकांचे लसीकरण करत आहोत, तर केंद्राने आम्हाला त्या तुलनेत लसीचे डोस द्यावेत. आम्ही म्हणतो तेवढे ५० ते ६० लाख लसीचे डोस आठवड्याला दिले, तर आम्ही ८ लाख लोकांचे दिवसाला लसीकरण करू शकतो. आपल्याकडे १३ हजार लसीकरण केंद्र, रुग्णालय आणि इतर केंद्र आहेत. त्यामुळे आपली लसीकरण क्षमता आपण १३ लाख लसींपर्यंत वाढवू शकतो, असे देखील राजेश टोपे यांनी नमूद केले.