आपली स्मृती उत्तम राहावी या करिता आजमावा हा उपाय


अनेकदा एखाद्या कामाची किंवा अभ्यासाची सुरुवात करीत असताना अगदी आठवणीने ध्यानामध्ये ठेवलेली महत्वपूर्ण माहिती काही काळानंतर आपल्या आठवणीतून साफ निघून जाते. विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षेच्या काळामध्ये अभ्यास करीत असताना ही समस्या हटकून उभी असते. अशा घटना सर्वांच्याच बाबतीत वारंवार घडत असतात. पण अशा प्रकारे लहान मोठ्या महत्वपूर्ण माहितीचा विसर सातत्याने पडत असणे हे क्वचित नुकसानकारकही ठरू शकते. आपल्या दैनंदिन कामांमध्ये आपल्या स्मृतीचे योगदान महत्वाचे असते. अपुरे पोषण देणारा आहार, अनियमित झोप, आणि अनियमित दिनचर्या या सर्वच गोष्टींचा परिणाम आपल्या स्मृतीवर होत असतो. वैज्ञानिकांच्या मते अशा अनेक गतीविधी आहेत, ज्यांचा अवलंब केला गेल्याने आपली स्मृती उत्तम राहण्यास मदत होते.

या बाबतीत वैज्ञानिकांनी अनेक संशोधने केली असून, एखादी नव्याने ऐकेली माहिती आठवणीत ठेवण्याकरिता त्या माहिती संदर्भात ‘टाचणे’ , म्हणजेच नोट्स बनवून ठेवल्यास ती माहिती लक्षात राहणे सहजसाध्य ठरत असल्याचे या संशोधनामध्ये म्हटलेले आहे. त्याचप्रमाणे एखादी माहिती जर आकर्षक चित्रांच्या रूपामध्ये आपल्या नजरेसमोर ठेवली गेली, तर ती माहिती सहज लक्षात रहात असल्याचेही वैज्ञानिक म्हणतात. यामागचे कारण असे, की एखादी माहिती शब्दरूपाच्या मानाने चित्ररूपामध्ये असल्यास आपला मेंदू ही माहिती अधिक प्रभावीपणे लक्षात ठेवतो. म्हणूनच लहान मुलांना भाषेची ओळख करून देताना शब्दरूपांच्या आधी चित्ररूपामध्ये एखाद्या नव्या वस्तूची ओळख करवून दिली जाण्याची पद्धत सर्वमान्य आहे.

‘एक्सपेरीमेंटल एजिंग अँड़ रिसर्च’ नामक जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अध्ययनाच्या अनुसार, शास्त्रज्ञांनी जो एक खास प्रयोग करून पहिला, त्यामध्ये एखादी वस्तू स्मृतीमध्ये ठेवण्याची क्षमता युवा लोकांमध्ये किती आहे आणि वृद्धांमध्ये किती आहे, हे जाणून घेण्यासाठी काही प्रयोग शास्त्रज्ञांनी या गटांवर केले. लोकांना दिली जात असलेली माहिती ते कशा प्रकारे अधिक उत्तमपणे लक्षात ठेऊ शकतात हे पाहण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करीत असतानाच, चित्ररूपामध्ये समोर आलेली माहिती युवा आणि वृद्ध या दोन्ही गटांना अधिक उत्तम रीतीने लक्षात राहत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपल्यासमोर येत असलेल्या माहितीला जर दृश्य, किंवा चित्ररूप दिले, आणि काही विशिष्ट शब्दांचा वापर यामध्ये केला गेला, तर ही माहिती अधिक चांगली लक्षात राहत असल्याचे निदान या अध्ययनाद्वारे करण्यात आले आहे.

Leave a Comment