करोनातून बरे झालेले रुग्ण होताहेत मधुमेही

करोना आणि मधुमेह म्हणजे डायबेटीस यांचे काय कनेक्शन असावे यावर बरेच संशोधन केले जात आहे. कारण आजपर्यंत असे दिसून आले आहे की ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यात करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. इतकेच नवे तर डायबेटिक लोकांना करोना झाला तर त्यांची प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण सुद्धा जास्त आहे.

पण करोनाच्या दुसऱ्या लाटेत आणखीन वेगळी निरीक्षणे नोंदविली गेली आहेत. त्यानुसार ज्यांना मधुमेह नव्हता पण करोना झाला, ते रुग्ण बरे झाल्यावर त्यांना मधुमेह होत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे जगभरात सर्वत्र असे आढळून आले आहे. करोनाचे नवे व्हेरीयंट यासाठी कारणीभूत ठरते आहे काय यावर आता वैज्ञानिक डेटा गोळा करत आहेत.

पहिल्या निरीक्षणानुसार ज्यांना टाईप १ किंवा टाईप दोन मधुमेह आहे त्यांना करोना झाला तर त्यांची प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण अधिक आहे आणि त्यामुळे त्या रुग्णांना उपचारांची जास्त गरज आहे. इतकेच नव्हे तर करोना मुळे मृत्यू येणाऱ्या रुग्णात मधुमेहींचे प्रमाण जास्त आहे.

किंग्स कॉलेज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मधील मोनाश विद्यापीठ या संदर्भात कोविड रुग्ण नोंदणी करत आहे. यात करोना झालेल्यात मधुमेही किती तसेच अगोदर मधुमेह नाही पण करोनातून बरे झाल्यावर मधुमेह झालेले रुग्ण किती याची आकडेवारी डॉक्टर्स कडून घेतली जात आहे. या संदर्भात ३७०० लोकांचे रिपोर्ट सांगतात यातील १४ टक्के रुग्णांना मधुमेह नव्हता पण कोविड मधून बरे झाल्यावर त्यांना मधुमेह झाला आहे. युके मध्ये ४७ हजार रुग्णांचा डेटा गोळा केला असून त्यात ५ टक्के लोकांना मधुमेह झाल्याचे दिसून आले आहे.

या मागे असे कारण सांगितले जात आहे की कोविडचा नवा व्हायरस शरीरात साखरेच्या चयापचय क्रिये मध्ये अडथळे आणत असावा आणि त्यामुळे करोना संक्रमिताना मधुमेह होत असावा. काळजी म्हणून ज्यांना करोना होऊन गेला आहे त्यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण वरचेवर तपासून पहावे असा सल्ला तज्ञ देत आहेत.