राजेश टोपेंवर टीका करताना पडळकरांची जीभ पुन्हा घसरली


सांगली: राज्यभरात येत्या १ मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असल्याचे यापूर्वी राज्य सरकारने जाहीर केले होते. पण जाहीर करण्यात आलेली ही लसीकरण मोहीम १ मे पासून राबवता येणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल २८ एप्रिल रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या भूमिकेवरून आरोग्यमंत्र्यांवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर हे पत्रकारांशी बोलत होते. एक तारखेपासून राज्य सरकार १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण करणार असल्याचे कालच सकाळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर काही तासांनीच संध्याकाळी ४ वाजता सांगितले की असे करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. जी पत्रकार परिषद सकाळी घेतली, ती मग काय गांजा ओढून घेतली होती का, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारला आहे.

उठ सूट यांना केंद्राकडे बोट दाखवायचे असून मुळात विचारसरणी एक नसताना, कोणताही अजेंडा नसताना ते एकत्र आल्याची खोचक टीकाही पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. त्यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांवर टीकास्त्र सोडले.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष भाजपचे राजकीय प्रस्थ संपविण्यासाठी एकत्र आले आहेत. कोणतीही विचारधारा या पक्षांना नाही. तसेच त्यांच्याकडे कोणताही ठोस अजेंडा नसताना हे तिन्हा पक्ष एकत्र आले आहेत. हे तिन्ही पक्ष भारतीय जनता पार्टीची जिरवण्यासाठी एकत्र आले आहेत. पण भाजपने चांगले काम केले आहे. म्हणूनच त्यांना ते जमू शकलेले नाही. यामध्ये महाराष्ट्रातील जनतेची जिरवण्याचे काम या सरकारने केल्याचा टोला पडळकर यांनी आघाडीतील तिन्ही पक्षांना गलावला आहे.

या सर्वांमधून राज्य सरकारने बाहेर पडायला हवे आणि महाराष्ट्रात कोरोनाने कोणाचीही मृत्यू होऊ नये त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहनही पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारला केले आहे.नन