अमेरिका भारताला एका आठवड्यात करणार 7.4 अब्ज रुपयांच्या आरोग्य साहित्याची मदत


वॉशिंग्टन – भारतातील परिस्थिती कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरातून भारताच्या या कोरोना विरोधातील लढ्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. या कामात आता अमेरिकेनेही पुढाकार घेतला असून येत्या आठवड्यात भारताला 7.41 अब्ज रुपयांच्या आरोग्य साहित्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


कोरोना विरोधातील लढ्यामध्ये अमेरिका भारताला शक्य तेवढी मदत करेल आणि भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल, असे व्हाईट हाऊसच्या एका निवेदनात सांगण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या आठवडाभरात भारताला 7.41 अब्ज रुपयांच्या कोरोना संबंधित साहित्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या साहित्यामध्ये 1000 ऑक्सिजनचे सिलेंडर, 1.5 कोटी N-95 मास्क आणि दहा लाख रॅपिड डायग्नोस्टिक चाचण्या यांचा समावेश आहे.


त्याचबरोबर अमेरिकन लस उत्पादक कंपनी असलेल्या अॅस्ट्राझेनेकाला व्हाईट हाऊसने निर्देश दिले आहेत की, लवकरात लवकर कोरोनाच्या अतिरिक्त लसींचे उत्पादन करावे आणि ते भारतासाठी पाठवाव्यात. भारताला मदत करण्यासाठी अमेरिकेने अॅस्ट्राझेनेकाला दोन कोटीपेक्षा अधिक लसींचे उत्पादन करण्याची परवानगी दिली आहे.