ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत परमबीर सिंग यांची पुन्हा उच्च न्यायालयात धाव


मुंबई – पुन्हा एकदा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेत नव्याने याचिका केली आहे. राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या चौकशीला परमबीर सिंग यांनी आव्हान देत यावेळी ठाकरे सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात लिहिलेले पत्र मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. तसेच आपल्याविरोधात एकापाठोपाठ एक गुन्हे राज्य सरकार दाखल करणार असल्याची माहिती मिळाल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला. ४ मे रोजी उच्च न्यायालयात त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

तत्पूर्वीर गृहमंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने परमबीर आणि अन्य दोघांनी केलेल्या जनहित याचिका रद्द केल्या होत्या. नियुक्ती किंवा बद्दल्यांबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी योग्य त्या व्यासपीठाकडे दाद मागावी. कारण त्यांनी केलेले आरोप हे सेवेशी संबंधित असल्याचे त्यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले होके. दरम्यान यावेळी देशमुख व सिंह यांच्यासह याप्रकरणी गुंतलेल्यांविरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची अ‍ॅड. जयश्री पाटील यांची याचिकाही न्यायालयाने निकाली काढली होती.

दरम्यान अकोल्यातील शहर कोतवाली पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध २२ कलमान्वये बुधवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल देशमुख पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्यांसाठी पैशांची मागणी करतात, ते तपासकार्यात वारंवार हस्तक्षेप करतात, असे आरोप परमबीर यांनी याचिकेत केले होते. त्यासाठी त्यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा, निलंबित अधिकारी सचिन वाझे व संजय पाटील यांना महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचे दिलेले लक्ष्य तसेच दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा दाखला दिला होता.

तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी होणे गरजेचे असून, तसे आदेश देण्याची मागणी परमबीर यांनी केली होती. तपासकार्यात देशमुख हे वारंवार हस्तक्षेप करतात, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजपच्या नेत्यांना गोवण्यासाठी त्यांनी दबाव आणला होता, असा आरोपही परमबीर यांनी केला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील अन्य वरिष्ठ नेत्यांना देशमुख यांच्याकडून होत असलेल्या खंडणीच्या मागणीबाबत आणि पोलिसांच्या बदल्या, नियुक्त्यांमधील भ्रष्टाचाराबाबत माहिती दिली होती. पण, त्यानंतर लगेचच माझी १७ मार्चला मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करुन गृहरक्षक दलात बदली करण्यात आली. आयुक्तपदी दोन वर्षे पूर्ण करण्याआधीच ही बदली करण्यात आल्यामुळे हा निर्णय मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला होता.