राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावल्यास करावा लागेल तिसऱ्या लाटेचा सामना, तज्ज्ञांचा इशारा


मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलेले असल्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्राला या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला आहे. अशातच राज्याला पुरेशा लसीचा पुरवठा होत नसल्यामुळे 1 मे पासून होणाऱ्या व्यापक लसीकरणाच्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान काही तज्ज्ञांनी राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावल्यास राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल, असा इशारा दिल्यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ झाली आहे.

1 मे पासून राज्यातील 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार होते. पण लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक बाधितांची संख्या आणि मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर सर्वांचे लसीकरण हाच पर्याय आहे. अशात लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊन तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागेल, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.