आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यात रेमडेसिवीरचे जास्त वाटप; न्यायालयाने मागितला तपशील


नागपूर : कोरोना परिस्थितीवरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी सुरु असून आज या संदर्भात राज्य सरकारने आपले प्रतिज्ञापत्र न्यायालयापुढे सादर करण्यासाठी वेळ मागितला. पण, त्याच वेळेस न्यायालयीन मित्र असलेल्या वकिलाने या प्रकरणात राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले. ज्या जालना जिल्ह्यातून राज्याचे आरोग्यमंत्री येतात त्या जिल्ह्यात पुन्हा एकदा 35 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचे जास्त वाटप झाल्याचा आरोप आज न्यायालयात झाला.

त्यानंतर उद्याच्या सुनावणीच्या वेळेला एफडीए नोडल अधिकाऱ्याला जातीने न्यायालयात उपस्थित राहून गेल्या काही दिवसात राज्यभरात किती रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप झाले, असून त्यातून कोणत्या जिल्ह्याला किती वाटा मिळाला आहे? याचा संपूर्ण तपशील न्यायालयापुढे मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. विशेष महत्वाचे म्हणजे सरकारने वाटप करताना काय निकष वापरले हेही उद्या न्यायालयाला सांगायचे आहे.

त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार संदर्भातील एका दुसऱ्या याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने असा काळाबाजार रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कठोर पावले उचलावीत, असे निर्देशही दिले आहेत.