सिरमच्या अदर पूनावाला याना धमक्या, वाय सिक्युरिटी दिली

कोविशिल्ड लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांना धमक्या दिल्या गेल्यामुळे वाय दर्जाची सिक्युरिटी दिली गेली आहे. यात चार ते पाच सशत्र कमांडो, पूनावाला यांना, ते जेथे जेथे देशभरात जातील तेथे सुरक्षा देणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या सिरम मध्ये सरकार व नियमन कार्य प्रमुख म्हणून काम करणारे प्रकाशकुमार सिंग यांनी १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिले होते. त्यात पूनावाला यांना लस आपूर्ति वरून विभिन्न समूहांकडून धमक्या मिळत असून त्यांच्या जीवाला धोका आहे असे नमूद केले आहे. त्यामुळे पूनावाला यांना सुरक्षा दिली जावी अशी विनंती पत्रात करण्यात आली होती. केंद्राने परिस्थिती लक्षात घेऊन पूनावाला याना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यात सीआरपीएफचे कमांडो पूनावाला यांच्या तैनातीत राहणार आहेत.

सिरमने देशात कोविशिल्ड लसीची किंमत वाढविल्याने त्यांच्यावर सडकून टीका केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर पूनावाला यांनी लसीची किंमत १०० रुपयाने कमी केल्याची घोषणा बुधवारी केली होती. आता ही लस ३०० रुपयात मिळू शकणार आहे.