राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांचे होणार मोफत लसीकरण


मुंबई : कोरोनाचे सावट अधिकच गडद होत असताना लसीकरण प्रक्रियेला देशाच आणि राज्यात वेग आला आहे. त्यातच लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य सरकारने लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात सर्व नागरिकांचे सरसकट मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.

1 मे पासून वय वर्ष 18 ते 44 अशा वयोगटातील नागरिकांना लसीकरणाच्या नव्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. राज्यात 5 कोटी 71 लाखांहून अधिक नागरिक या वयोगटातील आहेत. यासाठी तब्बल 12 कोटींच्या लसींची आवश्यकता राज्याला असणार आहे. यासाठीच्या खर्चाचा भार राज्य सरकारवर असणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवर 6 हजार 500 कोटी रुपयांचा भार असणार आहे. पण, कोरोनाविरोधातील या लढ्यात राज्य सरकारने मोठ्या जबाबदारीने हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मोफत लसीकरणाची मागणी सर्वच स्तरांतून करण्यात येत होती. शासनाच्या या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्याने उचललेले हे पाऊल मोठा दिलासा देणारं ठरत आहे. लसीकरण मोहिमेतील अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, आता लसींचा योग्य तो पुरवठा निर्धारित करत लसीकरण मोहिमेत सुसूत्रता आणण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे.